भाजप महिला नेत्यावर हल्ला. –
चेहऱ्यावर फेकला रासायनिक रंग
कोलकाता :- वृत्तसंस्था
पश्चिम बंगालच्या हुगळी लोकसभा मतदार संघातील भाजपच्या खासदार आणि चुंचुडा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार लॉकेट चॅटर्जी यांच्यावर रासायनिक रंग फेकण्यात आला. हा रंग त्यांच्या चेहऱ्यावर पडल्याने त्यांची तब्येत अचानक खालावली. त्यामुळे तातडीने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.
चुंचुडा येथील रविंद्रनगरच्या कालीटला भागात वसंतोत्सवादरम्यान ही घटना घडली. कोदालिया-२ ग्रामपंचायतीचे प्रमुख विद्युत विश्वास यांच्या नेतृत्वात काही अज्ञात लोकांनी हा हल्ला केल्याचे भाजपने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना चॅटर्जीं म्हणाल्या की, मला इजा पोहचवण्यासाठी रासायनिक रंग माझ्यावर फेकण्यात आले. माझ्यावर हल्ला करणारे लोक कोण आहेत हे पाहण्यासाठी जेव्हा मी पुन्हा त्यांच्याकडे पाहिले तेव्हा टीएमसीचे बॅजेस घातलेले ३-४ लोक दिसले.
पश्चिम बंगाल आणि आसाम या राज्यांमध्ये सध्या विधानसभा निवडणुकांच्या मतदानाचा पहिला टप्पा शनिवारी पार पडला. पश्चिम बंगालमध्ये ७९.७९ तर आसाममध्ये ७२.१४ टक्के मतदान झाले. पश्चिम बंगालमधील ३० तर आसाममधील ४७ जागांसाठी मतदान घेण्यात आले. यासाठी २१,८२५ मतदान केंद्रे उभारण्यात आली होती.
दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये १०,२८८ ईव्हीएम आणि तेवढ्याच व्हीव्हीपॅट मशिन वापरण्यात आल्या होत्या. तर आसाममध्ये ११,५३७ ईव्हीएम आणि ३७ व्हीव्हीपॅट मशिनचा वापर करण्यात आला.
