दिव्यांग भवनसाठी आठवडाभरात जागा निश्चित करू-आम. ऋतुराज पाटील.
कोल्हापुर. प्रतिनिधी.
कोल्हापूर शहरातील दिव्यांग बांधवांच्या प्रलंबित प्रश्नासंदर्भात कोल्हापूर महापालिकेच्या सासणे ग्राऊंड येथील निवडणूक कार्यालय येथे आज महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे व संबंधित अधिकारी यांच्यासमवेत आज सविस्तर बैठक घेतली.
यावेळी, दिव्यांग संघटनांच्या प्रतिनिधींनींकडून दिव्यांग बांधवांच्या विविध प्रश्नांबाबत आणि मागण्यांबाबत सविस्तर माहिती दिली. दिव्यांग बांधवांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी दिव्याग बांधवांच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींना विश्वासात घेऊन नियोजन करण्याच्या सूचना यावेळी केल्या.
तसेच, दिव्यांग बांधवांची प्रमाणपत्रे व आरोग्य विभागात येणाऱ्या अडचणींनींबाबत आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी योग्य मार्गदर्शन करून प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे.
याचसोबत, येत्या आठवडाभरात जागा निश्चित करून जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांसाठी दिव्यांग भवन उभारणीच्या कामाला लवकरच सुरुवात करू अशी ग्वाही या बैठकीमध्ये दिली.
या बैठकीला राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रदीप दीक्षित, उपायुक्त रविकांत अडसूळ, माजी नगरसेविका जयश्री चंद्रकांत जाधव, प्रहार अपंग संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवदत्त माने, क्रांती संघटनेचे संजय अडके, अपंग सेनेचे अनिल मिरजे, अतुल धनवडे, आनंदराव पाटील, नारायण माने, विकास चौगुले यांच्यासह दिव्यांग बांधव उपस्थित होते.