कोल्हा, की कुत्रा हल्ला कोणी केला. वनविभाग संभ्रमावस्थेत. – आजरा सोहाळेतील घटना.
आजरा. प्रतिनिधी.
आजरा तालुक्यातील सोहाळेत शेताकडे जाणाऱ्या महिलेवर कोल्ह्याने हल्ला केला त्या महिलेला सोडविण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला कोल्ह्याने चावा घेतल्याची घटना गुरुवारी (ता. २४ ) रोजी सकाळी १०.२० दरम्यान सोहाळे येथे घडली. गावाच्या सीमे नजिक अचानकपणे कोल्ह्याने हल्ला केल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. कोल्हाने हल्ला केल्यास याची चर्चा असली तरीही अद्याप कोल्ला की रानटी कुत्रा हे स्पष्ट झालेले नाही. या घटनेबाबत अधिक माहिती अशी
सोहाळे येथील महिला सुप्रिया राजेंद्र देसाई (वय ३५ ) या शेताकडे जेवणाचा डबा घेवून जात होत्या. घरापासून काही अंतरावर जाताच गावाच्या सीमेवरच जंगलातून येवून त्यांच्यावर कोल्ह्याने हल्ला केला. बाजूलाच घरात असणारे शामराव भाऊ देसाई (वय ६०) हे सौ. देसाई यांना सोडविण्यासाठी गेले असता कोल्ह्याने त्यांच्यावरही हल्ला केला. कोल्ह्याच्या तावडीतून सौ. देसाई यांना सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यापुर्वीच सुप्रिया यांच्या पायाला व हाताला कोल्ह्याने चावा घेतला. तसेच शामराव देसाई यांच्याही पायाला कोल्ह्याने चावा घेतला. दरम्यान घटनास्थळी आरडाओरड सुरु झाल्याने परिसरातील व रस्त्यावून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी गर्दी केली होती. त्यातच एक दुचाकीवाला त्या ठिकाणाहून जात असताना त्याच्यावरही कोल्ह्याने हल्ला केल्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखत नागरिकांनी कोल्ह्याला जंगलाच्या दिशेने हुसकावून लावले. तातडीने जखमींना उपचाराकरिता सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. हल्ला झाल्याचे समजताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सदरच्या घटनेची माहिती घेवून जखमींची विचारपूस केली. कोल्ह्याच्या हल्ल्यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभाकडून कोल्ह्याचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
गावाच्या सीमेवरच वन्यप्राण्यांची दहशत
काही वर्षापुर्वीच आता ज्या ठिकाणी कोल्ह्याने हल्ला केला आहे. त्याच परिसरात गावातील महिलेवर गव्याने हल्ला केल्याने महिलेचा मृत्यू झाला आहे. व गुरुवारी झालेल्या कोल्ह्याच्या हल्ल्यामुळे पुन्हा या परिसरात वन्यप्राण्यांची दहशत असल्याचे स्पष्ट होते. वन्यप्राण्यांच्या या दहशतीने सोहाळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
{ सदर घटनेबाबत वन विभाग आजरा यांच्याशी संपर्क केला असता अद्याप कोल्हा कुत्रा याबाबत माहिती मिळाले नसल्याचे सांगितले. }
