कणकवलीमधील चौकशीनंतर नितेश राणे यांना घेऊन सिंधुदुर्ग पोलीस गोव्यात दाखल.
कणकवली. प्रतिनिधी.
आमदार नितेश राणेंना पोलिसांनी मोठ्या फौजफाट्याच्या बंदोबस्तात बाहेर काढले होते. नितेश राणे यांना उद्यापर्यंत पोलीस कस्टडी मिळाली आहे. यावेळी राकेश परब आणि नितेश राणे यांचीही आज समोरासमोर चौकशी करण्यात आली
शिवसेना कार्यकर्ते संतोष परब हल्लाप्रकरणी आमदार नितेश राणे यांची पोलिस कसून चौकशी करत आहेत.आता या चौकशीचा भाग म्हणून पोलिस त्यांना गोव्याला घेवून गेले आहेत. काल कणकवली सत्र न्यायालयाने राणे यांना पोलिस कोठडी सुनावल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना सावंतवाडीमध्ये ठेवण्यात आले होते. तिथून आज सकाळी त्यांना पुन्हा कणकणवलीत आणण्यात आले. इथे त्यांची तब्बल ७ तास चौकशी करण्यात आली. यावेळी राकेश परब आणि नितेश राणे यांचीही समोरासमोर चौकशी करण्यात आली आहे. कणकवली पोलिसांना या चौकशीवेळी काही महत्वाचे धागेदोरे हाती लागल्याची शक्यता आहे. त्यानंतर पोलिस राणेंना घेवून गोव्यात गेले आहे. याशिवाय नितेश राणे यांना याच प्रकरणाच्या चौकशीसाठी पुण्यात देखील आणण्यात येणार असल्याची माहिती आहे. परब हल्ला प्रकरणाच कट पुण्यात आखण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे तपासासाठी नितेश राणे यांना पुण्याला आणण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. राणेंना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे पोलिसांनी वेगाने तपासाची सुत्र हालवायला सुरुवात केली आहे. तपासादरम्यान पुणे कनेक्शन समोर :- तपास अधिकारी सचिन हुंदळेकर यांनी आज कणकवलीत राणे आणि त्यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांची समोरासमोर चौकशी केली. यावेळी संतोष परब यांच्यावरी हल्ल्याचा कट पुण्यात शिजल्याचा पोलिसांना संशय आहे. कारण या प्रकरणातील सचिन सातपुते याच्यासह चार आरोपी हे पुण्यातील चंदननगर, खराडी भागातील आहेत. यातून या प्रकरणाचे पुणे कनेक्शन समोर आले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर सामनातून टीका झाल्यानंतर सामनाच्या कार्यालयावर दगडफेक झाल्याप्रकरणी सातपुते हा प्रमुख आरोपी होता. आता परब हल्ला प्रकरणाचा कट पुण्यात शिजल्याचे समोर येत असून, राणेंना तपासासाठी त्यांना पुण्याात आणले जाईल.उद्या नारायण राणे कोकणात. दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. नितेश राणेंना अटक झाल्यानंतर दिल्लीत असणारे राणे हे उद्या कणकवलीत दाखल होत आहेत. उद्या नितेश राणेंची दोन दिवसाची पोलीस कोठडी संपत असून त्यांना कणकवली पोलिसांकडून कोर्टात हजर केले जाणार आहे. त्यामुळे नितेश यांना आता उद्या न्यायालयीन कोठडी मिळणार पुन्हा पोलिस कोठडी याबद्दल सिंधुदुर्गमध्ये चर्चा सुरु आहे.