हजारोंचे प्राण वाचविणारा २८ वर्षे उपेक्षित. १९९३ मध्ये शक्तिशाली बॉम्ब निकामी करण्याची कामगिरी; मात्र पराक्रमाला मान्यता नाही
मुंबई :- प्रतिनिधी.
मुंबईत घडविलेल्या १९९३च्या बॉम्बस्फोट मालिकेदरम्यान गजबजलेल्या दादरमध्ये १२ किलो ‘आरडीएक्स’ जोडलेला शक्तिशाली बॉम्ब निकामी करून शेकडो नागरिकांचे प्राण वाचवणारे निवृत्त मेजर वसंत जाधव २८ वर्षांनंतरही उपेक्षित आहेत. निव्वळ अनुभव, बुद्धीचातुर्याच्या जोरावर केलेल्या कामगिरीचे कधी तरी कौतुक होईल ही आशा त्यांच्या वाढत्या वयोमानानुसार धूसर बनत आहे. बॉम्ब निकामी केल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी जाधव यांचे दूरध्वनीद्वारे आभार मानले होते. जाधव यांनी त्या स्मृती जागविणारे पत्र पवार यांना लिहिले आहे.
एअर इंडियाचे कनिष्का विमान १९८५मध्ये खलिस्तानी अतिरेक्यांनी स्फोट घडवत उडवून दिल्यावर नागरी उड्डाण (सिव्हिल एव्हीएशन) मंत्रालयाने देशाच्या चार महत्त्वाच्या विमानतळांवर बॉम्बशोधक व नाशक पथक (बीडीडीएस) उभारण्याचा निर्णय घेतला. मुंबई विमानतळावर १९८७मध्ये ‘ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हीएशन सिक्युरिटी’ (मुंबई विभाग) अंतर्गत बीडीडीएस सुरू करण्यात आले. त्याचे प्रमुख म्हणून निवृत्त मेजर जाधव यांना लष्करातून प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले होते. ३१ जानेवारी १९९३ रोजी ते लष्करातून निवृत्त झाले. मात्र नागरी उड्डाण मंत्रालयाने त्यांना मुंबई विमानतळाच्या सुरक्षेसाठी त्याच पदावर (उपायुक्त सुरक्षा) नियुक्त केले. पुढे दीड महिन्यात बॉम्बस्फोट मालिका घडली. जाधव यांनी एकहाती नायगाव क्रॉस लेन येथे बेवारस सापडलेल्या स्कू टरमधील शक्तिशाली बॉम्ब (इम्प्रोव्हाईज्ड एक्स्प्लोझीव्ह डिव्हाईस) निकामी केला. या कामगिरीसाठी जाधव यांच्या पथकातील जवानांना लष्कराने, केंद्र-राज्य सरकारने गौरविले. मात्र जाधव तेव्हा तांत्रिकदृटय़ा ना लष्करात होते ना पोलीस सेवेत, त्यामुळे ते उपेक्षितच राहिले.
वरळी पासपोर्ट कार्यालयाजवळ घडलेल्या स्फोटात जखमी होऊनही माहीम येथे सापडलेला जिवंत हातबॉम्ब (हॅण्ड ग्रेनेड) जाधव यांनी निकामी के ला. तत्पूर्वी त्यांनी जखमी, पण जिवंत व्यक्तींच्या बचावकार्यातही मदत केली. विमानतळावर रूजू झाल्यानंतर जाधव यांनी मुंबई पोलीस दलासह विमानतळावरील सुमारे दोन लाख अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले. बॉम्बस्फोट मालिकेपूर्वी उसळलेल्या जातीय दंगलीदरम्यान जाधव यांनी अनेक गावठी बॉम्ब निकामी करण्यात मुंबई पोलिसांना मोलाची मदत केली. भंगार सामानातून मुंबई बंदरावर आलेले इराण-इराक युद्धात न फु टलेले सुमारे ४५० तोफगोळे जाधव आणि त्यांच्या पथकाने निकामी केले.तो बॉम्ब निकामी करताना मी आता लष्करात नाही, पोलीस सेवेत नाही, हा विचार अजिबात डोकावला नव्हता. मुंबई पोलिसांनी सहकार्य मागितले आणि जबाबदारी समजून मी ती यशस्वीरित्या पार पाडली. पण निव्वळ प्रशासकीय बाब किं वा तांत्रिक अडचणीमुळे त्या कार्याला मान्यताच मिळू नये, ही सल कायम राहिली.
निवृत्त मेजर वसंत जाधव
आठ तासांचा थरार
दादरमध्ये आढळलेल्या बेवारस स्कू टरमध्ये स्फोटके आहेत, अशी सूचना जाधव यांना १४ मार्च १९९३च्या दुपारी दोनच्या सुमारास मिळाली. स्कू टरची डीकी अलगद उघडल्यावर आतील काळया चिकट द्रव्यात आरडीएक्स मिळसल्याचे जाधव यांनी गंधावरून ओळखले. मीठ किं वा साखर दाण्याच्या स्वरूपातील आरडीएक्स ग्रीस, इंजिन ऑइलमध्ये कालवून स्कू टरच्या डीकीत कोंबण्यात आले होते. हा बॉम्ब निकामी करण्यासाठी सर्वप्रथम ‘डीटोनेटिंग मॅकॅनीझम’ शोधणे आवश्यक होते. दोन दिवस कडक उन्हात स्कू टर उभी असल्याने हा लगदा वितळत होता. त्यामुळे तो जशास तसा बाहेर काढणे धोक्याचे होते. जाधव यांनी हा बॉम्ब जागच्या जागी निकामी करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी संपूर्ण परिसर निर्जन करण्यात आला.अनुभवाच्या जोरावर जाधव यांनी काळे चिकट आरडीएक्स कु रतडून काढण्यास सुरुवात केली. बऱ्याच वेळाने त्यांच्या हाती लगद्यात पेरलेली ‘टाइम पेन्सील’ लागली. ती लष्करी वापरातील होती. ती बाहेर काढताच बॉम्ब निकामी झाला. वितळलेले आरडीएक्स टाइम पेन्सीलच्या सूक्ष्म छीद्रात शिरल्याने ती निकामी ठरली आणि स्फोट घडला नाही हे नंतरच्या तपासणीत स्पष्ट झाले. १२ किलो आरडीएक्समध्ये ५००हून अधिक खिळे, लोखंडाचे टोकदार तुकडे मिसळण्यात आले होते.