गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात देवेंद्र फडणवीसांकडून हक्कभंग दाखल
मुंबई:-प्रतिनिधी.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडला आहे. अनिल देशमुख यांनी काल अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. देवेंद्र फडणवीस यांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण दाबल्याचा आरोप देशमुख यांनी केला होता. त्या प्रकरणी फडणवीस यांनी देशमुख यांच्याविरोधात हक्कभंगाची नोटीस दिली.
देशमुख यांनी केलेल्या आरोपांवर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ दिला. ‘अन्वय नाईक यांची हत्या झाली नसून आत्महत्या आहे. सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणी निकाल देताना आत्महत्येस प्रवृत्त केलं नसल्याचं स्पष्टपणे म्हटलं आहे. त्यामुळे हे प्रकरण दाबलं असं म्हणणं चुकीचं आहे. मी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सभागृहातदेखील सांगितला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असतानाही अशा प्रकारचं विधान देशमुख यांनी केलं. हे विधान न्यायालयाचा अवमान करणारं असल्याचं फडणवीस म्हणाले.
अनिल देशमुख यांनी माझ्यावर केलेले आरोप चुकीचे असून ते त्यांनी जाणूनबुजून केले आहेत, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. अन्वय नाईक यांच्याबद्दल केलेलं विधान अनिल देशमुख यांनी एकदा केले नसून त्यांची पुनरावृत्ती केली. सदर वक्तव्य करून त्यांनी माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे. मला जे स्वातंत्र्य मिळाले आहे, त्याचा भंग त्यांनी केला आहे. त्यामुळे हे प्रकरण विशेष हक्कभंग समितीकडे पाठवावे, अशी मागणी फडणवीस यांनी केली.
अन्वय नाईक प्रकरणात माझी चौकशी करा, असं खुलं आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला काल दिलं होतं. ‘अन्वय नाईक प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय समोर आल्यानंतर मुंबई पोलिसांचं थोबाड अक्षरश: काळं झालं आहे. जो तपास केला, त्यावर ताशेरे ओढले ते गृहमंत्री विसरले वाटतं. गृहमंत्र्यांनी हा तपास पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्यांनाही हे उत्तर आहे. अन्वय नाईक प्रकरणात त्यांनी माझी चौकशी जरुर करावी, पण अन्वय नाईक यांच्या जमिनी कोणी कोणी विकत घेतल्या याचीही चौकशी त्यांनी करावी,’ अशी मागणी त्यांनी केली.