नाणार पंचक्रोशीतील जवळपास 100 प्रकल्पग्रस्त राज ठाकरेंची भेट घेणार
मुंबई, प्रतिनिधी ०८ :-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी रत्नागिरीच्या नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पाचा मुद्दा पुन्हा उचलला आहे आणि मात्र तो पूर्वीच्या भूमिकेशी सांगड घालणारा नसला तरी राज्याचा हिताचा असल्याचं म्हटलं जातंय. कालच राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून नाणार प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाऊन देऊ नका, अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे राज्य सरकारने बासनात गुंडाळलेला नाणार प्रकल्प पुन्हा चर्चेचा विषय ठरला आहे.
👉दरम्यान, नाणारमधील जमीन मालकांना राज ठाकरेंनी बैठकीचे निमंत्रण दिले आहे. या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राज ठाकरेंनी केले आहे. राज ठाकरेंच्या निवासस्थानी ही भेट होणार आहे. आज सकाळी 11 वाजता ही भेट होण्याची शक्यता आहे.
नाणार पंचक्रोशीतील जवळपास 100 प्रकल्पग्रस्त राज ठाकरे यांची भेट घेतील. यापैकी बहुतांश जण हे जमीन मालक आहेत. याशिवाय, नाणार रिफायनरी प्रकल्प समर्थन समन्वय समितीचे अध्यक्षही या बैठकीला उपस्थित राहतील. यावेळी राज ठाकरे यांच्यापुढे नाणारमधील तब्बल 8500 जमीन मालकांची संमतीपत्रेही सादर करण्यात येतील. त्यामुळे आता राज ठाकरे नाणारच्या मुद्द्यावरुन आक्रमक होणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.