‘वर्षा बंगल्यावर धुणी-भांडी करायचं काम द्या’. – नेट – सेट धारकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
पुणे – प्रतिनिधी.
राज्य सरकारकडून राज्यात सहाय्यक प्राध्यापक भरतीला परवानगी दिली जात नसल्याने याविरोधात नेट सेट पात्रताधारकांनी अनोखे आंदोलन केले. नेट-सेट धारकांची वर्षा बंगल्यावर धुणी, भांडी कर्मचारी किंवा स्वयंपाकी म्हणून नियुक्त करा, अशा मागणीचे शेकडो ई-मेल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवून त्वरित भरतीचा निर्णय घ्या, अशी मागणी केली.
नेट, सेट, पीएच.डी धारक संघर्ष समितीतर्फे रविवारी ही मोहीम राबविण्यात आली. राज्यातील नेट, सेट पात्र झालेले तरुण महाविद्यालयांमध्ये तुटपुंजा पगारावर काम करत आहेत. लॉकडाऊनमुळे तर अनेकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. राज्य सरकारकडून प्राध्यापक भरतीचा निर्णय घेतला जावा त्यासाठी संघर्ष समितीतर्फे वारंवार शासनाला निवेदन दिले आहे.
‘उच्च तंत्र शिक्षण मंत्रालयाच्या उपक्रमात मंत्री उदय सामंत यांना प्रत्येक विद्यापीठात निवेदन दिले आहे. मात्र, प्राध्यापक भरतीचा निर्णय घेण्याची मानसिकता नाही. यामुळे आज संघर्ष समितीतर्फे ई-मेल मोहीम राबविण्यात आली. यामध्ये जर सरकारला प्राध्यापक भरती करता येत नसेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आम्हाला त्यांच्या घरी धुणी भांडी करणे, वॉचमन म्हणून नेमणूक करणे, स्वयंपाकी म्हणून काम द्या, बागकाम करण्यासाठी नोकरी द्यावी अशा मागण्यांचे इमेल पाठविण्यात आले आहेत.
संघर्ष समितीचे समन्वयक प्रा. सुरेश देवढे पाटील म्हणाले, ‘‘प्राध्यापक भरती होत नसल्याने बेरोजगार तरुणांची काय स्थिती आहे, हे मुख्यमंत्र्यांना लक्षात आणून देण्यासाठी ई-मेलची मोहीम राबविण्यात आली. राज्यभरातून नेट, सेट पात्रताधारक, पीएच.डी धारकांनी मोठ्या प्रमाणात ई-मेल केले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या घरातील कामे करण्यासाठी नियुक्ती करा, अशी मागणी केली आहे.