आळंदी . प्रतिनिधी. २७
आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळ्यानिमित्त दिंडी जात असताना मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात चार महिलांचा मृत्यू झाला तर २३ महिला वारकरी जखमी झाल्या आहेत. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस, रुग्णवाहिका व स्थानिक नागरिकांनी जखमींना औषधोपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. ही घटना पुणे-मुंबई महामार्गावर साते गावच्या हद्दीत शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली.
वडगावचे पोलीस निरीक्षक विलास भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यासाठी उंबरे (ता. खालापूर) येथील माऊली कृपा चॅरिटेबल ट्रस्ट दिंडी सोहळ्यात खालापूर, कर्जत, खोपोली परिसरातील गावातील सुमारे दोनशे वारकरी पायी दिंडीने येत होते. त्यात महिलांचा सहभागही लक्षणीय होता. रात्री त्यांचा नायगाव येथील गुरुदत्त मंगल कार्यालयात मुक्काम होता. शनिवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास पालखीने आळंदीकडे प्रस्थान ठेवले. सकाळी साडेसहाच्या सुमारास दिंडी साते फाट्याजवळ आली असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेला पिकअप टेम्पो (MH- 12, SX- 8562) दिंडीत घुसला. त्याने पालखी रथाला ठोकर देऊन पुढे चाललेल्या महिलांच्या जथ्याला चिरडले.
या महिला वाकऱ्यांचा मृत्यू
ही दिंडी साते गावच्या हद्दीत आली असता, पालखी घेऊन जाणाऱ्या पायी दिंडीमध्ये अपघात झाला. यात जयश्री आत्माराम पवार (वय 55, रा. भूतीवली, ता. कर्जत), कुसुम ऊर्फ सविता वाळकू यरम (वय 55, रा. उंबरे, ता. खालापूर), विमल सुरेश चोरघे ( वय 50, रा. बीड खुर्द ) व संगीता वसंत शिंदे ( वय 56, रा. कर्जत ) या महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर जखमींना कामशेत येथील महावीर हॉस्पिटल, बढे हॉस्पिटल, कान्हे येथील शासकीय ग्रामीण रुग्णालय व सोमाटणे येथील पवना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे.
टेम्पो चालकाला अटक
माहिती मिळताच पोलिसही घटनास्थळी आले. त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलवले. या अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जणींचा दवाखान्यात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, लोणावळा विभागीय पोलीस अधीक्षक राजेंद्र पाटील यांनीही घटनास्थळी भेट दिली. टेम्पो चालक राजीव प्रमोद चौधरी ( वय 30, रा. वाघोली, पुणे ) याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस निरीक्षक विलास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार विकास सस्ते पुढील तपास करत आहेत.