मुंबई. प्रतिनिधी.
आगामी महानगरपालिका निवडणुका तसेच काही ठिकाणी होत असलेल्या पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापताना पाहायला मिळत आहे.
नांदेड जिल्ह्यातील देगलूर बिलोली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. साबणे यांचा भाजपमधील प्रवेश शिवसेनेला धक्का असल्याचे मानले जात आहे. भाजपच्या या खेळीमुळे शिवसेनेत अस्वस्थता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असून, यातच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सुभाष साबणे यांच्यावर टीका करत, रडणाऱ्यांना, पळपुट्यांना शिवसेनेत स्थान नाही, या शब्दांत खडे बोल सुनावले आहेत.
रावसाहेब अंतापुरकर यांच्या आकस्मिक निधनानंतर देगलूर बिलोली मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. येत्या ३० ऑक्टोबर रोजी या जागेसाठी मतदान होणार आहे. महाविकास आघाडी नसताना युतीचे उमेदवार म्हणून साबणे यांनी शिवसेनेकडून या ठिकाणाहून निवडणूक लढवली होती. अंतापूरकर यांच्या निधनानंतर साबणे यांनी या जागेवर दावा केला होता. शिवसेनेने या जागेसाठी आग्रह धरला नाही. आपल्याला संधी मिळण्याची शक्यता कमी असल्याचे दिसताच साबणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांची उमेदवारीही जाहीर केली आहे. त्यामुळे शिवसेनेमध्ये अस्वस्थता असल्याचे बोलले जात आहे.
रडणाऱ्या पळपुट्यांना शिवसेनेत स्थान नाही
नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत साबणे यांनी भाजमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत, ते शेतकऱ्यांचे दुख: समजू घ्यायला गेले होते की, नांदेडला जाऊन शिवसेनेचे माजी आमदारांना पक्षात घ्यायला गेले होते हे लोकांना कळले आहे.गेली अनेक वर्ष ते काँग्रेस, राष्ट्रवादीचे लोक घेत होते. भाजपकडे स्वतःचे काही नाही. निवडणूक लढण्यासाठी त्यांनी आमचा माणूस घेतला आणि तोही रडका, असा खोचक टोला लगावत शिवसैनिक हा परिस्थितीच्या विरुद्ध रडत नाही, तर लढतो. रडणाऱ्यांना, पळपुट्यांना शिवसेनेत स्थान नाही. पण भाजपाने हे काही नवीन धोरण सुरू केले आहे. स्वतःचे काही नसल्यामुळे दुसऱ्यांची लोक घ्यायचे. हे फार काळ चालत नाही, या शब्दांत संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
दरम्यान, संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून केलेल्या टीकेला भाजपचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. जे लोक ऑफिसमध्ये बसून टीका करतात. अग्रलेख लिहून नेते होतात. त्यांना शेतकऱ्यांचे दु:ख काय माहीत? त्यांना शेतकऱ्यांचे अश्रू काय कळणार? हे ऑफिसमधले लीडर आहेत. हे कागदावरचे लीडर आहेत. त्यांना काय उत्तर द्यायचे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना लगावला.