तर जालना जिल्हा पोलीस प्रशासनामध्ये उडाली खळबळ
जालना :-प्रतिनिधी.०३
माझी संध्याकळपर्यंत बदली झाली नाही, तर मी अज्ञात ठिकाणी जाऊन आत्महदहन करीन, असा इशारा देऊन जालना पोलीस दलातील पोलीस हवालदार बेपत्ता झाले आहेत. या घटनेमुळे जालना जिल्हा पोलीस प्रशासनामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. जालना जिल्हा पोलीस दलातील अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. पोलिसांच्या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात तक्रारी येत असतानाच आज हा प्रकार घडल्याने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आहे.
जालना पोलीस दलात करण्यात आलेल्या बदल्यांमध्ये राजकारण आणि पक्षपात करण्यात आल्याचा आरोप पोलिसांकडून करण्यात येत आहे.त्यातच घनसांगवी पोलीस ठाण्यात कर्यरत असलेले पोलीस हवालदार गोविंद कुलकर्णी यांनी पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांची भेट घेऊन विनंती बदलीचा अर्ज दिला होता.परंतु, आतापर्यंत दोन ते तीन बदल्यांच्या याद्या निघाल्या.मात्र, यामध्ये गोविंद कुलकर्णी यांची बदली झाली नसल्याने ते नाराज झाले होते.त्यामुळे त्यांनी आज एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर स्वत:चा व्हिडिओ बनवला.यामध्ये माझी संध्याकाळपर्यंत बदली झाली नाही, तर मी अज्ञात ठिकाणी जाऊन आत्मदहन करीन, असा इशारा दिला आहे.
गोविंद कुलकर्णी यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जालना जिल्हा पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.गोविंद कुलकर्णी यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची धावपळ सुरु झाली होती.
दरम्यान सायंकाळच्या सुमारास कुलकर्णी यांचा शोध लागला असल्याचे नियंत्रण कक्षला सांगण्यात आले.
