कणकवली :-प्रतिनिधी.३१
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा अडविण्याच्या घोषणा शिवसेनेकडून करण्यात आल्या; पण प्रत्यक्षात एकही शिवसैनिक अथवा त्यांचा पदाधिकारी रस्त्यावर उतरण्याची हिंमत दाखवू शकला नाही.आजच्या शिवसैनिकांची मला कीव येतेय,अशी टीका भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज केली.
येथील भाजप संपर्क कार्यालयात तेली यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, ”जन आशीर्वाद यात्रेवेळी केवळ दिखाव्यापुरताच शिवसेनेकडून विरोध झाला; पण समोर येण्याचे धाडस कुणी करू शकले नाहीत. आमच्या वेळची शिवसेना आणि शिवसैनिक वेगळे होते. कुणा मंत्र्याची गाडी अडवायची असा इशारा देऊन थांबत नव्हते. तर प्रत्यक्षात कृती करून दाखवत होते.आमच्यावेळी देखील पोलिस बंदोबस्त होता.काँग्रेसचे सरकार सत्तेवर होते; पण आम्ही आंदोलने करून दाखवली आहेत.”
पुढे तेली म्हणाले, ”शिवसेनेच्या आमदारांनीही केवळ इशारा दिला. रस्त्यावर येण्याचे धाडस ते देखील दाखवू शकले नाहीत. त्यामुळे आताची शिवसेना काय आहे हे सर्वसामान्य जनतेला कळून चुकले आहे. किंबहुना आताच्या शिवसैनिकांचे वर्ग घेण्याची वेळ आली आहे. गेले तीन दिवस सुरू असलेल्या जन आशीर्वाद यात्रेवेळी काही शिवसैनिक केवळ राणेंसाहेबांना पाहण्यासाठी आले होते. राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेला संपूर्ण कोकणातून उदंड प्रतिसाद मिळाला. सर्वसामान्य नागरिक देखील राणेंचे स्वागत करण्यासाठी पुढे आले होते. भाजप कार्यकर्त्यांच्या प्रचंड मेहनतीमुळेच ही यात्रा यशस्वी होऊ शकली, असे तेली म्हणाले.
दिपक केसरकरांनी संघर्षाची भाषा करू नये
एकीकडे भाजपमध्ये येण्यासाठी चर्चा करायची. देवेंद्र फडणवीस यांचे पाय धरून मनधरणी करायची आणि दुसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका करायची. आमदार केसरकर यांनी संघर्षाची भाषा करू नये. हजारो कोटींच्या उद्योगांबाबतही बोलू नये. मंत्री असताना त्यांना रोजगार देणारा एकही उद्योग उभारता आला नाही. आता ते दोन हजार कोटींचे अम्युझमेंट पार्क उभे करण्याच्या वल्गना करत असल्याचे तेली म्हणाले.
