🟣“माझे गाव, डेंग्यूमुक्त गाव!” — प्राथमिक आरोग्य केंद्र, वाटंगी केंद्राचा अभिनव उपक्रम.
🟣शक्तीपीठ विरोधी मोर्चा यशस्वी करणार.- मसोली, पेरणोली, देवर्डे येथील शेतकऱ्यांच्या बैठकीत निर्धार.
🟣“माझे गाव, डेंग्यूमुक्त गाव!” — प्राथमिक आरोग्य केंद्र, वाटंगी केंद्राचा अभिनव उपक्रम.
आजरा ( प्रतिनिधी. )

महाराष्ट्र शासनाच्या “माझे गाव आरोग्य संपन्न गाव” अभियान अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, वाटंगी ता. आजरा यांच्या वतीने १६ मे राष्ट्रीय डेंग्यू दिन विविध जनजागृतीपर व प्रतिबंधात्मक उपक्रमांनी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. “एक पाऊल स्वच्छतेकडे, एक पाऊल आरोग्याकडे” हा संदेश देत गावागावांत विशेष डेंग्यू प्रतिबंध मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेत कंटेनर सर्वे, घरभेटी, स्वच्छता मोहीम, डास उत्पत्ती स्थळांची तपासणी तसेच नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करण्यात आली. आरोग्य विभागाच्या पथकांनी पाण्याच्या टाक्या, कुलर, ड्रम, फुलदाण्या, जुने टायर तसेच साचलेल्या पाण्याच्या ठिकाणांची तपासणी करून नागरिकांना डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती दिली.
डेंग्यू हा डेंग्यू विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार असून तो एडिस एजिप्ती डासाच्या चाव्यामुळे पसरतो. हा डास प्रामुख्याने स्वच्छ साचलेल्या पाण्यात वाढतो. वाढते शहरीकरण, सांडपाण्याची अयोग्य विल्हेवाट आणि परिसरात साचणारे पाणी ही डेंग्यू वाढण्याची प्रमुख कारणे असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
“डास हटवा – डेंग्यू रोखा”, “स्वच्छ गाव – निरोगी गाव” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. नागरिकांना डेंग्यूची लक्षणे व प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. अचानक ताप येणे, तीव्र डोकेदुखी, सांधे व स्नायू दुखणे, उलट्या होणे, अंगावर पुरळ येणे तसेच गंभीर अवस्थेत रक्तस्त्राव होणे ही डेंग्यूची प्रमुख लक्षणे असल्याची माहिती देण्यात आली.
यावेळी डास नियंत्रणासाठी जैविक उपाय म्हणून गप्पी मासे सोडण्याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. गप्पी मासे डासांच्या अळ्या खात असल्याने डासांची पैदास कमी होण्यास मोठी मदत होते, याबाबत ग्रामस्थांना प्रत्यक्ष माहिती देण्यात आली. तसेच आठवड्यातून एक दिवस “ड्राय डे” पाळणे, परिसर स्वच्छ ठेवणे, पूर्ण बाह्यांचे कपडे वापरणे, मच्छरदाणीचा वापर करणे व ताप आल्यास तात्काळ आरोग्य केंद्रात तपासणी करणे आवश्यक असल्याचे आवाहन करण्यात आले.
सदर उपक्रम तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. जी. गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. ए. शेख, आरोग्य निरीक्षक अतुल पाथरवट, आरोग्य सहाय्यक जे. एच. साबखान, आरोग्य सहायिका गीतांजली सुतार तसेच आरोग्य सेवक युनुस सय्यद, शिवम तरोळे, दर्शन भालेराव, दिपक हरणे, लक्ष्मण घोरपडे, प्रमोद कांबळे व रोहित शेंडे यांनी यशस्वीपणे राबविला.
या मोहिमेला आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविका, युवक मंडळे व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सामूहिक सहभागातून “माझे गाव, डेंग्यूमुक्त गाव” हा संकल्प अधिक दृढ करण्यात आला.
🟣शक्तीपीठ विरोधी मोर्चा यशस्वी करणार.- मसोली, पेरणोली, देवर्डे येथील शेतकऱ्यांच्या बैठकीत निर्धार.
आजरा – प्रतिनिधी.
शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांचा सोमवारी होणारा मोर्चा मोठ्या संख्येने उपस्थित राहून यशस्वी करण्याचा निर्धार गावोगावी होत असलेल्या शेतकऱ्यांच्या बैठकांमधून करण्यात येत आहे. नुकताच आजरा एमआयडीसी येथे झालेल्या टोल मधून आजरा तालुका वगळण्याचा निर्णय झाला असून या निर्णयामुळे आजरा तालुक्यातील लढणाऱ्या जनतेला बळ मिळाले आहे. गेली तीन वर्ष आजरा तालुक्यातील जनता टोलविरोधी आंदोलन करीत आहे. या आंदोलनामुळे टोल मधून तालुक्यातील घरगुती वापराच्या खाजगी वाहनांना सवलत मिळाली आहे. हा एक प्रकारे लढणाऱ्या जनतेचा विजय आहे. म्हणूनच आजरा तालुक्यातील जनता संघर्षावर विश्वास ठेवून सोमवारच्या मोर्चात मोठ्या संख्येने उतरणार आहे असे शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे निमंत्रक कॉम्रेड संपत देसाई यांनी सांगितले गेले.
ते म्हणाले आठवड्यापूर्वी आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येत आजरा तहसील कार्यालयावर १८ तारखेला सोमवारी मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. हा केवळ इशारा न होता प्रत्यक्ष मोर्चात मोठ्या संख्येने उतरून शक्तीपीठ महामार्गाला आमचा विरोध आहे हे तालुक्यातील जनता दाखवून देईल.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तानाजी देसाई म्हणाले राज्यभर या विरोधात मोठ्या प्रमाणात शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. आजरा तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने लढ्यात उतरून हा तालुका लढणाऱ्यांचा आहे हे दाखवून देईल. कोणत्याही परिस्थितीत शक्तिपीठ महामार्ग होऊ द्यायचा नाही या निर्धाराने तालुक्यातील शेतकरी आता कामाला लागला आहे.
मसोली येथे झालेल्या बैठकीत ए के पावले, सरपंच श्री गुरव यांनी स्वागत व प्रस्ताविक केले. पेरणोली येथील सभेत सुभाष देसाई, सुरेश कालेकर, विठ्ठल मस्कर, आदेश गुरव, कृष्णा सावंत, सर्जेराव देसाई, अमृत सावंत यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर देवर्डे येथील सभेत मुकुंद तानवडे, जोतिबा चाळके, निवृत्ती कांबळे, बळीराम तानवडे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
