राज्यभरात सद्या पावसाचा जोरदार धुमाकूळ – दोन दिवसात सर्वात अधिक पाऊस कुठे पडणार पहा.- हवामान अंदाज..
मुंबईः- प्रतिनिधी.

मुंबईसह राज्यभरात सद्या पावसाने जोरदार धुमाकूळ घातला आहे. आजही हवामान विभागाने मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यासाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर नवी मुंबई, ठाणे, भिवंडी, पालघर, कल्याण डोंबिवलीमधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मुंबई शहरासह रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये 4 ते 6 जुलै दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच, मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांच्या घाट परिसरातही या कालावधीत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. या कालावधीत स्थानिक प्रवासात अडथळे आणि काही प्रमाणात संरचनात्मक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांनी या काळात सतर्क राहावे. विशेषतः सखल भागांमध्ये आणि घाट रस्त्यांवर प्रवास करताना अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक आपत्कालीन क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात येत आहे.
त्याचबरोबर भारतीय हवामान विभागाने मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीसाठी पुढील 5 दिवसांचा पावसाचा अंदाज जाहीर केला आहे. या अंदाजानुसार, 04 आणि 05 जुलै रोजी पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यात अत्यंत मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषतः पालघर आणि रायगड
जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. हवामान खात्याने 7 जुलैपर्यंत पावसाचा हा जोर कायम राहील असा अंदाज वर्तवला आहे. 4 ते 5 दिवसात विक्रमी पाऊस होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाचा आहे. आज जवळपास सर्व ठिकाणीच पावसाचा इशारा देण्यात आला. कुठे रेड, ऑरेंज जारी करण्यात आला. गुजरात ते आग्रेय अरबी समुद्रात हवेता कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. राज्यात पुढील दोन ते तीन दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.


