Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रमराठी हीच आपली खरी ओळख - प्रा. दिलीप संकपाळ.( आजरा महाविद्यालयात मराठी...

मराठी हीच आपली खरी ओळख – प्रा. दिलीप संकपाळ.( आजरा महाविद्यालयात मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा.)

मराठी हीच आपली खरी ओळख – प्रा. दिलीप संकपाळ.
( आजरा महाविद्यालयात मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा.)

आजरा – प्रतिनिधी

आजच्या जागतिकीकरणाच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी इंग्रजी आवश्यक असली, तरी मराठी भाषा हीच आपली अस्मिता आणि संस्कृतीची जननी आहे. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी मराठीसारखे प्रभावी माध्यम दुसरे नाही, त्यामुळे मराठी हीच आपली खरी ओळख बनली पाहिजे, असे मत प्रा. दिलीप संकपाळ यांनी व्यक्त केले.
आजरा महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने मराठी राजभाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्त ग्रंथ प्रदर्शन आणि मराठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.
त्यानंतर उपप्राचार्य प्रा. दिलीप संकपाळ यांचे ‘आजच्या काळात मराठी भाषेचे महत्त्व’ या विषयावरील विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. अशोक सादळे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. डॉ. आप्पासो बुडके यांनी सर्वांना मराठी भाषा संवर्धन शपथ दिली.
प्रा. संकपाळ पुढे म्हणाले की, मराठी केवळ घरात बोलण्यापुरती मर्यादित न ठेवता ती व्यवहाराची आणि तंत्रज्ञानाची भाषा बनली पाहिजे. वाचन संस्कृती जोपासल्यास मराठी भाषेचे भविष्य अधिक उज्वल होईल.
कार्यक्रमात अथर्व मोहिते, संचिता तरडेकर, श्रेया लटके, क्षितिजा ढोकरे, सानिका पन्हाळकर, अक्षरा कांबळे, सानिका गुंजाळ यांनी कुसुमाग्रजांच्या निवडक कवितांचे वाचन केले. श्रुती कांबळे हिने ‘अभिमान माय मराठीचा’ या विषयावर भाषण केले. तिचा प्राचार्य डॉ. सादळे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. सादळे, मराठी विभाग प्रमुख डॉ. आनंद बल्लाळ, प्रा. विनायक चव्हाण यांची भाषणे झाली. यावेळी पर्यवेक्षक प्रा. मनोज पाटील, अधीक्षक योगेश पाटील, ग्रंथपाल प्रा. रवींद्र आजगेकर, प्रा. योगिता भोकरे, प्रा. सुषमा नलावडे, प्रा. मल्लिकार्जुन शिंत्रे, डॉ. अविनाश वर्धन आदी उपस्थित होते. प्रा. वैशाली देसाई यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन निदा इंचनाळकर हिने तर समृद्धी कालेकर हिने उपस्थितांचे आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.