आजरा तालुक्यातील युवकांचे एकदिवसीय प्रशिक्षण उत्साहात संपन्न. ( कोकण विकास – सोसायटी, पणजी व सामाजिक संवेदना संस्था आजरा यांच्या संयुक्त विद्यमाने )
आजरा.- प्रतिनिधी.

कोकण विकास – सोसायटी, पणजी व सामाजिक संवेदना संस्था आजरा यांच्या संयुक्त विद्यमाने Welead प्रकल्पांतर्गत कुरकुंदेश्वर अकादमी, वेळवट्टी ता.आजरा. आजरा तालुक्यातील युवकांचे एकदिवसीय प्रशिक्षण उत्साहात पार पाडले. यावेळी सामाजिक संवेदना संस्थेचे अध्यक्ष संपत देसाई,गडहिंग्लज येथील ओंकार महाविद्यालयाचे प्रा. अनिल पाटील प्रकल्पाचे समन्वयक राजेंद्र कांबळे, प्रकाश मोरुस्कर, यांच्यासह तालुक्यातील ७० हुन अधिक तरुण उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना प्रा.अनिल पाटील म्हणाले की, भारतात संसदीय लोकशाही अस्तित्वात आल्यानंतर हा देश कसा चालावा, देशाच्या हिताची कोणती धोरणे घ्यावीत, शेती, शिक्षण, आरोग्य, उद्योग यासह समाजातील विविध घटकांना न्याय देता येईल यासाठी प्रतिनिधी निवडले. त्यांना आपण खासदार आमदार म्हणतो. ते संसदेत, विधानसभेत जातात तिथे कायदे आणि लोकहिताचे निर्णय केले जातात. त्यामुळे आपली जबाबदारी वाढते. योग्य प्रतिनिधींची निवड करणे. आपल्यातूनच नवे नेतृत्व घडवणे यासाठी ही कार्यशाळा आयोजित केली आहे. अशा कार्यशाळेतुनच नवे नेतृत्व विकसित होते.
कॉ.संपत देसाई म्हणाले की हा देश तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. आजच्या तंत्रविज्ञानाच्या काळात आपल्याकडे माहितीचे नवे स्रोत मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. अशावेळी आपण या स्रोतांचा योग्य वापर करून स्वतःचे नेतृत्व विकसित केले पाहिजे. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रकाश मोरुस्कर यांनी प्रास्तविक करून कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. यावेळी राजेंद्र कांबळे,यांनीही मार्गदर्शन केले. कार्यशाळेत पेरणोली, एरंडोळ, हाळोली-मेढेंवाडी,पारपोली – खेडगे व अल्याचीवाडी – गवसे या गावातून ७० हुन अधिक युवक – युवती उपस्थित होते.
