कोण आरोग्यमंत्री? कसला फोन? गडहिंग्लज विवाह नोंदणी कार्यालयातील क्लार्कची उद्धट विचारणा.
( उद्धट कर्मचाऱ्यावर कारवाई करावी नागरिकांची मागणी,)
आजरा :- प्रतिनिधी.
आरोग्यमंत्री कोण? कसला फोन? अशी उद्धट विचारणा करीत विवाह नोंदणी प्रक्रिया लांबविण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने मोठा प्रताप काल त्या कार्यालयातच केला. कोण राज्याचे आरोग्यमंत्री? अशी विचारणा करीत फोन तर घेतला नाहीच, पण उलट विवाह नोंदणी प्रक्रिया लांबवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. यावर आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या स्वीयसहायकाने त्यांच्या वरिष्ठांची कानउघडणी केल्यावर संबंधित प्रक्रिया विनाविलंब पार पडली.
आजरा येथील एका गृहस्थाच्या मुलाचा यावर्षी जून महिन्यात विवाह झाला. याबाबतची नोंद मुलगा वास्तव्यास असलेल्या गडहिंग्लज नगरपालिकेच्या विवाह नोंदणी कार्यालयात करण्यासाठी विहित नमुना आणि योग्य त्या कागदपत्रांसह प्रस्ताव दाखल केला. त्यावर शिक्कामोर्तब होण्यासाठी मिळालेल्या काल सोमवारी दिनांक १ डिसेंबरला मुहूर्त मिळाला. दरम्यानच्या कालावधीत या विभागातील कर्मचारी श्री परीट अनेकवेळा सुटीवर असल्याचे अथवा या विभागाचे अधीक्षक अधिकारी श्री खोत उपलब्ध नसल्याची सबब सांगत ही कार्यवाही टाळली जात होती.

सोमवारच्या मुहूर्तावर यासंबंधीच्या सर्व साक्षीदारांना विवाह नोंदणी कार्यालयात आणल्यावर अधीक्षक खोत दोन वाजता जेवायला जाणार असल्याचे सांगितले गेले. कसेबसे एकत्र आलेले साक्षीदार इतका वेळ कसे राहणार या भीतीने पालकमंत्री आबिटकर यांना संबंधित पालकांनी संपर्क केला. तो फोन घेऊन लवकर कार्यवाही होईल अशी अपेक्षा असताना, कर्मचारी परीट यांनी कोण आरोग्यमंत्री?अशी उद्धट विचारणा करीत वाद घातला. तसेच लागलीच श्री खोत यांच्या कार्यालयात जाऊन जादूची कांडी फिरवली व ते आता साडेचार वाजता उपलब्ध येतील असे जाहीर केले.
ही बाब पालकमंत्र्यांच्या स्वीयसहायकांच्या कानावर घातल्यावर त्यांनी लगेच त्याच कॉलवर अधीक्षक चंद्रकांत खोत यांना कॉन्फरन्सवर घेतले. पुन्हा जादूची कांडी फिरली आणि संबंधितांच्या विवाह नोंदणी कागदपत्रावर सही झाली. एकूणच हा प्रकार अत्यंत हीन दर्जाचा असल्याच्या प्रतीक्रिया यानिमित्ताने उपस्थितांनी व्यक्त केल्या. म्हणूनच मंत्रिमहोदयांना कोण मंत्री? अशी विचारणा करणाऱ्या संबंधित उद्धट कर्मचाऱ्यावर कारवाई करावी, अशा अपेक्षा यानिमित्ताने व्यक्त होत आहेत.
