आजरा.प्रतिनिधी. १९.
प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करूनच पाणीपूजन करावे.
प्रकल्पग्रस्तांचे जलसंपदा मंत्रीमहोदयाना नम्र आवाहन.
उत्तूर- गडहिंग्लज-आजरा तालुक्यातील शेतकर्यांची शेती सिचंनाखाली यावी म्हणून आंबेओहळ धरण बांधले गेले. यावर्षी या धरणात पाणीही तुंबविले गेले. प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मात्र अजून सुटलेले नाहीत. ‘आधी पुनर्वसन मगच धरण/प्रकल्प’ हा शासन निर्णय २००६ साली ज्या आघाडी सरकारच्या काळात झाला तेच आघाडीचे सरकार आज सत्तेवर असताना असे घडणे चुकीचे आहे. पुनर्वसन न करताच धरणात पाणी अडविणे हे सामाजिक न्यायाला तर धरून नाहीच ते कायदा मोडणारे आहे. लोकशाही व्यवस्थेवर विश्वास असणार्या महाविकास आघाडीसाठीही तर हे अजिबात भूषणावह नाही. म्हणूनच आमची राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांना विनंती आहे त्यांनी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करूनच पाणी पूजनाचा कार्यक्रम यावे. आम्हीही त्यात आनंदाने सहभागी होऊ. त्यांच्या स्वागताच्या कमान्या उभारू.
खरं या विभागाचे प्रतींनिधी आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. हसन मुश्रीफ यांनी वारंवार बैठका घेऊन सूचना केल्या असतांनाही केवळ प्रशासनाच्या वेळकाढूपणामुळे आंबेओहळ प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन रखडले. पुनर्वसन कायद्यातील तरतुदी नुसार जे निर्णय जिल्हाधिकारी स्तरावर घ्यायचे ते सुद्धा चालढकल करीत उगाच मंत्रालय, आयुक्त कार्यालयाकडे पाठवून सहज सुटणारे प्रश्न गुंतागुंतीचे बनविले. त्यामुळे अनेक प्रश्न सुटण्यास दिरंगाई झाली. जिल्हाधिकारी स्तरावरील संकलन दुरूस्ती सारखा साधा प्रश्न अत्यंत किचकट बनवून प्रकल्पग्रस्तांना वेठीस धरले गेले.
खरं तर ज्या प्रकल्पग्रस्तांच्या त्यागातून धरणे उभी राहिली, ज्यांची घरेदारे, संसार उध्वस्त झाला त्यांचे पुनर्वसन व्हावे, त्यांनाही या विकासातील वाटा मिळावा यासाठी झालेल्या जनसंघर्षातून पुनर्वसन कायदा झाला. पण त्याची अमलबजावणी मात्र नीट होत नाही. अधिकारी आपल्या सोयीचे अर्थ काढून प्रकल्पग्रस्तांना आधार देण्याऐवजी त्यांना मानसिक त्रास कसा होईल असा व्यवहार केला आहे. आमची दोन्ही मंत्री महोदयाना विनंती आहे. की आपण ज्या आघाडी सरकारचे घटक आहात त्यांना लोकाभिमुख कामाचा फार मोठा वारसा आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, राजरामबापू पाटील ते शरद पवार अशी सामान्य कष्टकरी जनतेबाबत संनवेदनशील राहण्याची परंपरा आहे. या परंपरेचे आपण वारस आहत. म्हणूनच आपल्याला विनंती आहे आंबेओहळ धरणाचे पाणी पूजन करण्यापूर्वी प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत. असे झाले तर आम्हीही या कार्यक्रमात आनंदाने सहभागी होऊ.
टीप- धरणाची कामे अपुरी असताना घळभरणी करण्याची इतकी घाई का केली असा एक प्रकल्पग्रस्तांना सतत पडत आहे. धरणाचे गेट, बाहेरील बाजूचे पिचिंग अजून झालेले नाही. धरणाच्या सुरक्षिततेचा विचार करता या दोन्ही बाबी तातडीने होणे गरजेचे आहे. यावर्षी जसा पाऊस झाला तसाच पाऊस पडत राहिला तर धरणाच्या बाहेरील माती वाहून जाऊन धरण धोक्यात येऊ शकते. याबाबत जलसंपदा मंत्री महोदयांनी गांभीर्याने लक्ष घालावे. असे दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष संपत देसाई, शिवाजी गुरव, महादेव खाडे, शिवाजी येजरे, सचिन पावले, बजरंग पुंडपळ, राजू देशपांडे, सखाराम कदम यांच्यासह प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.
