आजरा : दीपावली पाडवा मुहूर्तावर एकाच दिवशी २ कोटी ७६ लाख ४९ हजार १११ ठेव संकलन.- चेअरमन श्री भुसारी
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा येथील स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था मर्या., आजरा या संस्थेने दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर. संस्थेच्या सभासद, ठेवीदार, खातेदार यांनी दिलेल्या उत्स्फुर्त प्रतिसादाच्या जोरावर संस्थेने अवघ्या एका दिवसात तब्बल रू. २ कोटी ७६ लाख ४९ हजार १११ इतके ठेव संकलन करत संस्थेच्या आर्थिक बळकटीकरणाचा व आपल्या विश्वासार्हतेचा ठसा उमटवला आहे.
सभासदांचा आणि ठेवीदारांचा वाढता विश्वास हीच संस्थेच्या प्रगतीची खरी ताकद आहे.
सभासदांच्या हिताचे दृष्टीने व संस्थेच्या आर्थिक स्थैर्यासाठी संस्था सातत्याने नावीन्यपूर्ण योजना राबवते. संस्थेच्या संचालक मंडळाच्या नियोजनबध्द कार्यपध्दती आणि सभासदांच्या विश्वासामुळेच हे विक्रमी ठेव संकलन करणे साध्य झाल्याचे संस्थेचे चेअरमन दयानंद भुसारी यांनी सांगितले या ठेव संकलनामुळे पतसंस्थेच्या आर्थिक स्थैर्यात आणखी भर पडली आहे तसेच समाजाला आर्थिक दृष्टया भक्कम आधार देण्याचे ध्येय साध्य करण्यासाठी संस्था कटिबध्द असल्याचे त्यांनी सांगितले.
संस्थेकडे रू. ४ कोटी ५६ लाख वसुल भागभांडवल, रू. १८० कोटी २५ लाख ठेवी, रू. १५१ कोटी २८ लाख कर्जवाटप, रू. ४४ कोटी १४ लाख बँक गुंतवणूक व ऑडिट वर्ग सतत ‘अ’ असून एकूण ९ शाखा कार्यरत आहेत. सर्व ठिकाणी संस्थेच्या स्वमालकीच्या इमारती आहेत.
संस्थेच्या सर्व शाखांकडे ऑनलाईन वीज बिल, फोनबिल, डीटीएच रिचार्ज, सोनेतारण कर्जाची सोय, मनिट्रान्स्फर करणेची सोय, एनईएफटी, आरटीजीएस, क्यू आर कोड, आयएमपीएस, एसएमएस इ. अनेक सुविधा सभासदांकरिता उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
संस्थेच्या सर्व शाखा संगणकीकृत आहेत. संस्थेला राज्यपातळीवरील अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
संस्थेचे सभासद, ठेवीदार, ग्राहक, हितचिंतक यांनी संस्थेवर दाखविलेल्या प्रचंड विश्वासाबद्दल व कर्मचारी यांनी ठेव संकलनासाठी केलेल्या विशेष परिश्रमाबद्दल संस्थेचे चेअरमन दयानंद भुसारी, व्हा. चेअरमन सुधीर बाबुराव कुंभार, सरव्यवस्थापक अर्जुन कुंभार व संचालक मंडळ यांनी सर्वांचे आभार मानले.

