लाचखोर RTO सानपची दिवाळी जेलमध्ये.- दोन्ही लाचखोरांच्या घरच्यांची दिवाळी अंधारात…
नागपूर.- प्रतिनिधी.
राज्यात परिवहन विभागातील तळापासून – शेंड्यापर्यंत चाललेला भ्रष्टाचार “शिगे”ला पोहोचला असून गेल्या काही दिवसांपासून ही “शिग सांडायला” सुरुवात झालेली आहे. राज्यातील अनेक RTO अधिकारी एसीबीच्या तावडीत सापडून “जेलच्या वाऱ्या” करीत आहेत.
विदर्भातील जनतेला मूर्ख व अडाणी समजून त्यांना “लुटण्याचा गोरखधंदा” सुरू करणाऱ्या लुटारू आरटीओ निरीक्षकांना व अधिकाऱ्यांना ह्याच जनतेने अगदी पाचशे ते दोन पाच हजारांच्या क्षुल्लक रकमेसाठी एसीबीच्या सापळ्यात अडकवून जेल वारीसाठी पाठविले आहे.गेल्या पाच,सहा महिन्यात चंद्रपूर,यवतमाळ,भंडारा व नागपूरच्या आरटीओना चांगलीच अद्दल घडविण्यात असून सर्वाधिक लाचखोरांना विदर्भातूनच पकडून देण्यात आले आहे हे विशेष.
परवा नागपूर ग्रामीणच्या एका RTO ला कनिष्ठ लिपिकासह चार हजार रुपयांच्या लाचेसाठी रंगेहाथ अटक करण्यात आली असून राज्याच्या परिवहन विभागात “खुलेआम” चालत असलेला भ्रष्टाचार “चव्हाट्या”वर आला आहे.
अनुप शरद सानप, वय ४३ वर्ष,पद सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, प्रादेशिक परिवहन कार्यालय नागपूर ग्रामीण, रा. ए १०५, श्री गणेश अपार्टमेंट, धरमपेठ नागपूर व मोहन शेषराव दिवटे वय ५४ वर्ष, पद कनिष्ठ लिपिक, प्रादेशिक परिवहन कार्यालय नागपूर ग्रामीण, रा. डुप्लेक्स नंबर १८, श्रीधर रेसिडेन्सी, बेसा रोड नागपूर अशी ह्या दोघा लाचखोरांची नावे आहेत.
या प्रकरणातील तक्रारदार याचा ट्रान्सपोर्टिंगचा व्यवसाय असून त्याचा प्रादेशिक परिवहन कार्यालय नागपूर ग्रामीण, येथे जप्त असलेला ट्रक क्रॉसिंग न करता गिट्टीसह सोडविण्याकरिता आरोपी मोहन दिवटे, कनिष्ठ लिपिक व अनुप सानप, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी तक्रारदारास ५००० रुपये लाच रकमेची मागणी केली. तक्रारदार यांनी लाच रक्कम मागणीबाबत नागपूर एसीबीच्या कार्यालयात प्रत्यक्ष जावून दि.१६/१०/२०२५ रोजी लेखी तक्रार दिली होती.
दि.१७/१०/२०२५ रोजी तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीची शासकीय पंचासमक्ष पडताळणी केली असता लाचखोर मोहन दिवटे, कनिष्ठ लिपिक याने ५००० रुपयांवरून तडजोअंती ४००० रुपयांची लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दाखविली. तर दुसरा लाचखोर अनुप सानप, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी याने तक्रारदाराला “दिवटे बाबूंशी बोलून घ्या ते तुम्हाला सांगतील त्याप्रमाणे करून घ्या” असे बोलून त्यास प्रोत्साहन दिले.
नागपूर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवार दि.१७/१०/२०२५ रोजी सायंकाळी मोहन दिवटे व अनुप सानप या दोन्ही लाचखोर अधिकारी,कर्मचाऱ्यावर शासकीय पंचा समक्ष प्रादेशिक परिवहन कार्यालय नागपूर ग्रामीण येथे सापळा लावला असता मोहन दिवटे व अनुप सानप यांनी ४००० रुपये लाचेची रक्कम मागणी करून मोहन दिवटे याने पंचासमक्ष स्वीकारली असता त्याला सापळा पथकाने ताब्यात घेतले.
लाचखोर आरोपी मोहन दिवटे याची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातून २५०० रु. व अनुप सानप याचे ताब्यातून ६५३५० रुपये जप्त करून दोघांचेही मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
दरम्यान दोन्ही आरोपींच्या घरची झडती घेण्याची आली असून त्याठिकाणी नेमके काय काय सापडले हे एसीबीने अजूनतरी जाहीर केलेले नाही.
या लाचखोरीच्या प्रकरणातील दोन्ही आरोपींवर पो.स्टे. कपिलनगर,नागपूर शहर येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम ७, ७(अ),१२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काल शनिवार दि.१८ / १० / २०२५ रोजी दोन्ही लाचखोर आरोपींना नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयात एसीबीचे विशेष न्यायाधीश आर.एम.सादरानी ह्यांच्या न्यायालयात उपस्थित केले असता ह्या दोघांनाही एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

उद्या सोमवारपासून दिवाळीनिमित्त जिल्हा न्यायालयाला दहा दिवसांच्या तर उच्च न्यायालयाला दि.२/११/२०२५ पर्यंत सुट्ट्या जाहीर झाल्या असल्याने ह्या दोन्ही लाचखोरांची दिवाळी कारागृहातच जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदरहू यशस्वी कारवाई सापळा अधिकारी राजकिरण येवले,पोलिस निरीक्षक, एसीबी. नागपूर ह्यांनी केली असून पुढील तपास श्रीमती. भारती गुरनुले, पोलीस उपअधीक्षक, एसीबी. नागपूर या करीत आहेत.
