“स्वदेशीचा दीप – अंधांच्या हातांनी उजळलेला”- स्वदेशी वस्तूंचा वापर करा.- गर्जना प्रतिष्ठानचे आवाहन.
आजरा.- प्रतिनिधी.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी दिलेल्या “हर घर स्वदेशी” या आवाहनाला प्रतिसाद देत गर्जना प्रतिष्ठान तर्फे एक सामाजिक व प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात येत आहे.
नेत्रचळवळ संचलित अंधांचे रोजगार केंद्र, गडहिंग्लज येथील अंध बांधवांनी स्वतःच्या हातांनी तयार केलेले आकर्षक आकाशकंदील व लाईट माळा गर्जना प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहेत.
या विक्रीतून होणारा १०० टक्के नफा अंध रोजगार केंद्र, गडहिंग्लज येथे देण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींना दिवाळी भेट स्वरूपात हेच स्वदेशी कंदील, लाईट माळा आणि शुभेच्छा पत्र गर्जना प्रतिष्ठानमार्फत स्पीड पोस्टद्वारे पाठविण्यात आले आहे.
या उपक्रमाचा एक भाग म्हणून आज गर्जना प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिगंबर मिसाळ, गर्जना परिवार प्रमुख प्रकाश बेलवाडे स्वयंसेवी कार्यकर्ते विनायक चिटणीस व जोतिबा नांदवडेकर यांनी आजरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, महसूल अधिकारी तसेच विविध शासकीय अधिकाऱ्यांना भेट देऊन या उपक्रमाची माहिती दिली व अंध बांधवांनी तयार केलेले स्वदेशी कंदील भेट स्वरूपात दिले.
या उपक्रमामुळे अंध बांधवांना रोजगाराचा नवा किरण मिळत असून “स्वदेशीचा दीप” उजळविण्याचे कार्य गर्जना प्रतिष्ठान करत आहे. याबाबतचे आवाहन गर्जना प्रतिष्ठानने केले आहे.

