🟣पंतप्रधान मोदी आणि सरसंघचालक भागवत दोघेही ७५ वर्षांचे.- निवृत्तीच्या वक्तव्यानंतर भागवत पुन्हा म्हणाले, ७५ वर्षे जगण्यापेक्षा..
🟣सदोष ई-बस पुरवल्याने ‘या’ कंपनीला ५५ कोटींचा दंड!
🟥ईव्हीएमवर आता उमेदवारांचा रंगीत फोटो दिसणार.- निवडणूक आयोगाचे ऐतिहासिक पाऊल.- बिहार निवडणुकीपासून श्रीगणेशा.
🟣पंतप्रधान मोदी आणि सरसंघचालक भागवत दोघेही ७५ वर्षांचे.- निवृत्तीच्या वक्तव्यानंतर भागवत पुन्हा म्हणाले, ७५ वर्षे जगण्यापेक्षा..
नागपूर :- प्रतिनिधी
पंतप्रधान मोदी यांचा आज ७५वा वाढदिवस आहे. भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचाही ७५ वा वाढदिवस झाला. या दोघांचेही अमृतमहोत्सवी वर्ष आहे. सरसंघचालक डॉ. भागवत यांचा काही दिवसांपूर्वी नागपूरमधील एका कार्यक्रमात ७५ वर्ष आणि निवृत्तीवरून एका विधान केले होते. यावरून देशभर चर्चा झाली.यानंतर डॉ. भागवत यांनी मोदींना निवृत्त होण्याच्या संकेत दिले अशीही चर्चा रंगली होती. मात्र, नुकत्याच झालेल्या दिल्लीच्या विज्ञान भवन येथील कार्यक्रमात यासंदर्भात स्पष्टीकरण दिले होते. त्यानंतर श्री श्री रविशंकर यांच्या नागपूरमध्ये चार दिवसांपूर्व झालेल्या सत्संगमध्ये डॉ. भागवत यांचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शाल आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करतानाही डाॅ. भागवत यांनी वयाच्या ७५ वर्ष पूर्ण होण्यावर एक महत्त्वाचे विधान केले आहे.
जुलै महिन्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक असलेले मोरोपंत पिंगळे यांच्या आयुष्यावरच्या पुस्तकाचे प्रकाशन करत असताना मोहन भागवत यांनी पंचहात्तरीची शाल अंगावर पडली की ती वेळ थांबायची असते असे विधान केले होते. या विधानामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. पिंगळे यांच्या एका संवादाचा दाखला देताना भागवत यांनी हे विधान केले होते.
भागवत म्हणाले होते, “मोरोपंत पिंगळे एकदा म्हणाले की जेव्हा पंचाहत्तरीची शाल अंगावर पडते त्याचा अर्थ आता थांबावे, तुमचे वय झाले आहे; बाजूला सरा, आम्हाला काम करु द्या” ही आठवण मोहन भागवत यांनी आपल्या भाषणात सांगितली होती. मात्र, याचा संबंध मोदींच्या निवृत्तीशी जोडण्यात आला होता.
🔴भागवत नागपूरमध्ये काय म्हणाले?
११ सप्टेंबरला मोहन भागवत यांचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले. नागपूरमध्ये श्री श्री रविशंकर यांनी त्यांचा सत्कार केला. दरम्यान, मार्गदर्शन करताना भागवत म्हणाले की, अमृत महोत्सव साजरा केला त्याबद्दल ऋणी आहे. मात्र, संघामध्ये व्यक्तीचे वर्धापन दिवस साजरा करण्याला काही महत्त्व नसते. मी काहीही केले नसते तरी माझे पंच्यात्तर वर्ष पूर्ण झाले असते. जर मधात मृत्यू आला नसता तर. त्यासाठी काहीही करावे लागत नाही. ७५ वर्षे जगलो हे माझ्या मते काहीही महत्त्वाचे नाही. आपण कसे जीवन जगलो हे अधिक महत्त्वाचे आहे. आमचे जीवन भगवान शंकरासारखे गेले तर त्याला सर्वाधिक आनंद आहे, असेही भागवत म्हणाले.
🟣सदोष ई-बस पुरवल्याने ‘या’ कंपनीला ५५ कोटींचा दंड!
पुणे :- प्रतिनिधी
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यातील इलेक्ट्रिक बस सदोष असल्याने एका कंपनीला ५५ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सदोष ई-बसमुळे प्रवासी सेवेवर परिणाम झाल्याने संबंधित वाहने तातडीने दुरुस्त न केल्यास कंपनीला काळ्या यादीत (ब्लॅक लिस्ट) टाकण्याचा इशारा पीएमपीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांनी दिला.
पीएमपी इलेक्ट्रिक आणि वातानुकूलित बस सेवा देत असून, संबंधित कंपनीमार्फत करारावर ई-बस घेण्यात आल्या आहेत. संचलनादरम्यान काही बस बंद पडत असल्याच्या तक्रारी यापूर्वी आल्या होत्या. त्या वेळी बसची दुरुस्ती करण्यात आल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. पुन्हा या तक्रारी येऊ लागल्याने ई-बसची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये बॅटरी निकृष्ट असल्याचे समोर आले.
‘तपासणीत ४५ ई-बस बंद पडल्या असून, त्याचा वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. त्यामुळे ओलेक्ट्रा ग्रीनटेक लि. या ई-बस उत्पादन कंपनीला ५५ कोटींचा दंड ठोठावण्यात आला.. तसेच, तातडीने निकृष्ट बॅटऱ्या बदलून तांत्रिक दुरुस्ती करून देण्याबाबत सूचना केल्या,’ असे पंकज देवरे यांनी स्पष्ट केले, कंपनीकडून बॅटऱ्या दुरुस्ती आणि तांत्रिक बिघाड दूर करण्याचे काम सुरू असून ५५ कोटी रुपयांचां दंड भरण्यात आला असल्याचेही देवरे यांनी नमूद केले. मात्र, वाहने पुन्हा बंद पडल्यास तांत्रिक बिघाड आढळून आल्यास या कंपनीला काळ्या यादीत (ब्लॅक लिस्ट) टाकून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देवरे यांनी दिला.
दरम्यान, ओलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीशी याबाबत संपर्क साधण्यात आला असता, त्यांंच्याकडून प्रतिसाद देण्यात आला नसला, तरी संबंधित कंपनीकडून ५५ कोटी रुपयांचा दंड पीएमपी प्रशासनाकडे भरण्यात आला आहे.

🟥ईव्हीएमवर आता उमेदवारांचा रंगीत फोटो दिसणार.- निवडणूक आयोगाचे ऐतिहासिक पाऊल.- बिहार निवडणुकीपासून श्रीगणेशा.
फोटो रंगीत असो या ब्लॅक – अँड व्हाईट- पण मतदान केलेल्या मतदान जावो…. मतदारांचे मत.
नवी दिल्ली :- वृत्तसंस्था
भारतीय निवडणूक आयोगाने ऐतिहासिक पाऊल उचलत मतदान यंत्रावर नाव आणि चिन्हासह उमेदवारांचा रंगीत फोटोही लावण्याचा निर्णय घेतला आहे. बिहारमधील मतदारयाद्यांच्या विशेष सखोल फेरतपासण्यांचा मुद्दा देशभर चर्चेत असतानात भारतीय निवडणूक आयोगाने बिहार निवडणुकीपासूनच मतदान यंत्रावर उमेदवाराचा रंगीत फोटो लावण्याचा निर्णय घेतला आहे.
दिवाळी सणानंतर बिहार विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागले आहे. निवडणुकीआधीच राजकीय पक्षांमध्ये वर प्रतिवार होत आहेत. या वादापासून निवडणूक आयोगही दूर नाही. निवडणूक आयोगाच्या मतदार यादी फेरतपासणीवर विरोधी पक्षाने जोरदार आक्षेप नोंदवून प्रक्रिया थांबविण्याची विनंती केली. हा वाद देशभर गाजत असताना निवडणूक आयोगाने बुधवारी मतदारांना डोळ्यासमोर ठेवून स्तुत्य निर्णय घेतला.
अनेक वेळा नाम साधर्म्यामुळे मतदारांमध्ये मोठा गोंधळ उडतो. तोच गोंधळ टाळण्यासाठी तसेच मतदारांचा संभ्रम दूर करण्यासाठी मतदान यंत्रावर उमेदवारांचे फोटो असावेत, अशी मागणी अनेक वर्षे करण्यात येत होती. अखेर निवडणूक आयोगाने बिहारपासून श्रीगणेशा करून सजग मतदारांना चांगली भेट दिली आहे. मतदारांना दिसेल असा ठसठशीत आणि ठळक फोटो छापण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिलेले आहेत. दुसरीकडे उमेदवारांच्या नावांवरून, नामसाधर्म्यामुळे होणारा गोंधळ टाळण्यासाठी सगळी नावे एकसमान फॉन्टमध्ये असतील. जेणेकरून मतदारांना वाचण्यात कुठलीही अडचण येणार नाही.
निवडणूक आयोगाने उमेदवारांचे सिरियल नंबर आणि नोटाचा पर्यायही अधिक ठळक करण्याचा निर्णय घेतला आहे. बिहारमध्ये वादग्रस्त ठरलेल्या मतदार याद्यांच्या फेरतपासणीचा मुद्दा महाराष्ट्रातही डोकावणार आहे. कारण बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही मतदार याद्यांची फेरतपासणी होणार आहे. देशभरातील मतदार याद्यांची फेरतपासणी करण्याच्या तयारीत निवडणूक आयोग आहे. देशभरातील मतदार याद्यांची फेर तपासणीचा आढावा भारतीय निवडणूक आयोगाकडून घेण्यात आला. महाराष्ट्रात महापालिका निवडणूक आणि स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीपूर्वी मतदार याद्यांची फेरतपासणी होण्याची शक्यता आहे.
