🟥कणकवलीतील बारावीच्या विद्यार्थ्याचे अपहरण झाल्याचा संशय..
🟥बचतगटाच्या पैशांवरून मारहाण.- दांपत्यावर गुन्हा.
🟥कणकवलीतील बारावीच्या विद्यार्थ्याचे अपहरण झाल्याचा संशय..
कणकवली :- प्रतिनिधी
कणकवली तालुक्यातील एका गावातील बारावीत शिकणाऱ्या १७ वर्षीय विद्यार्थ्याचे अपहरण झाल्याच्या संशयावरून त्याच्या नातेवाईकांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ही घटना १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.४४ वा.च्या सुमारास घडली. या विद्यार्थ्याला आई-वडील नाहीत. त्यामुळे तो आपल्या आत्येकडे राहून शिक्षण घेत आहे. शुक्रवारी नेहमीप्रमाणे कॉलेजमधून घरी परतला. मात्र, सायंकाळी घरात त्याचा मोबाईल फोन असूनही तो कुंठे दिसला नाही. त्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी सर्वत्र त्याचा शोध घेतला, पण तो सापडला नाही. कोणीतरी त्याला फूस लावून पळवून नेले असावे, असा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.
🟥बचतगटाच्या पैशांवरून मारहाण.- दांपत्यावर गुन्हा.
कणकवली :- प्रतिनिधी
बचतगटाच्या पैशांवरून झालेल्या एका किरकोळ वादातून एका कुटुंबातील तिघांवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना कणकवली तालुक्यातील वाघेरी येथे घडली. शेजाऱ्याऱ्यांनी केलेल्या मारहाणीत कुटुंबप्रमुख उमेश खेडकर यांच्यासह त्यांची आई आणि पत्नी गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी हल्ला करणाऱ्या पती-पत्नीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
🅾️ही घटना गुरुवारी सायंकाळी ६.३० वा. च्या सुमारास वाघेरी – खाड्याचे मांगर येथे घडली. याप्रकरणी उमेश अशोक खेडकर (३५) यांच्या फिर्यादीवरून सुधाकर राघो गोसावी (५०) व त्याची पत्नी वंदना सुधाकर गोसावी (दोघेही रा. वाघेरी-खाड्याचे मांगर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
🟥उमेश खेडकर आणि त्यांचे शेजारी सुधाकर गोसावी यांच्यात बचतगटाच्या पैशांवरून वाद सुरू होता. उमेश खेडकर हे गुरुवारी सकाळी कामावर गेले होते. ते सायंकाळी ६.३० च्या सुमारास घरी आले. त्यावेळी सुधाकरने अचानक लाकडी दांडा आणून उमेशवर हल्ला चढवला. सुधाकरच्या या हल्ल्यामुळे उमेशच्या उजव्या हाताला आणि डाव्या पायाला जबर मार लागला.आपल्या मुलाला मारहाण होताना पाहून उमेश यांची आई अनिता आणि पत्नी चेतना त्यांना सोडवण्यासाठी धावून आल्या. त्याचवेळी सुधाकरची पत्नी वंदना गोसावी तिथे पोहोचली. तिने आपल्या पतीला थांबवण्याऐवजी, त्यांना सोडू नका, दांड्याने झोडून काढा, असे ओरडत हल्ल्यासाठी प्रोत्साहन दिले.त्यानंतर सुधाकर आणि त्याच्या पत्नीने तिघांनाही निर्दयीपणे मारहाण केली. मारहाणीदरम्यान, लाकडी दांड्याला असलेल्या खिळ्यामुळे अनिता यांच्या उजव्या हाताच्या कोपरावर दुखापत झाली. तर उमेशची पत्नी चेतना हिच्या पोट, हात आणि पायांवर दांड्याने मार लागला.या प्रकरणी उमेश खेडकर यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी सुधाकर गोसावी आणि त्याची पत्नी वंदना यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१), ३ (५) आणि ३५२ नुसार गुन्हा दाखल केला. तपास पोलीस हवालदार चंद्रकांत झोरे करत आहेत.
