🟣शक्तीपीठला पर्यायी मार्ग.-
शोधण्याचे अवर सचिव राजेश भोगले.- यांचे आदेश.
🟣व्यंकटराव प्रशालेमध्ये कै अमृतरावजी देसाई (काका) यांच्या पुण्यदिनानिमित्त प्रतिमापूजन संपन्न..
💥शक्तीपीठला पर्यायी मार्ग.-
शोधण्याचे अवर सचिव राजेश भोगले.- यांचे आदेश.
कोल्हापूर.- प्रतिनिधी.
कोल्हापूर जिल्ह्यातील शक्तीपीठला कोणते पर्याय आहेत, त्या पर्यायांची तपासणी करण्याचे आदेश – अवर सचिव राजेश भोगले यांनी आज दिले आहेत. आ सतेज पाटील आणि माजी खा राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विरोधाची धास्ती घेऊन शासनाने आज पवनार ते सांगली पर्यंतच शक्तीपीठ महामार्गला मंजुरी दिली आहे.
शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली लढ्यामुळे सरकारला मूळ रस्त्याची आखणी बदलायला भाग पाडले आहे. हा शेतकऱ्यांचा अंशतः विजय आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांना आणि पर्यावरणाला उध्वस्त करणारा शक्तीपीठ रद्द होईपर्यंत हा लढा चालूच राहणार आहे.
आजरा येथे भर पावसात निघालेला मोर्चा असो की तिरंगा आमच्या रानात हे आंदोलन असो या आंदोलनांनी जमीन आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी लढण्याची शेतकऱ्यांची जिद्द दाखवून दिली आहे. संपूर्ण शक्तीपीठ महमार्ग रद्द होईपर्यंत हा लढा चालूच राहील. अशी माहिती कॉ संपत देसाई
समन्वयक, शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
🟣व्यंकटराव प्रशालेमध्ये कै अमृतरावजी देसाई (काका) यांच्या पुण्यदिनानिमित्त प्रतिमापूजन संपन्न..
आजरा :- प्रतिनिधी.

येथील व्यंकटराव शिक्षण संकुल आजरा मध्ये आजरा महाल शिक्षण मंडळ आजरा येथे संस्थेचे प्रदीर्घकाळ अध्यक्ष पद भूषविलेले तसेच आजऱ्याच्या राजकीय, सामाजिक व सहकार क्षेत्रातील कार्यकर्तृत्व व्यक्तिमत्व कै. अमृतरावजी (काका) देसाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त संस्थेचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी यांच्या हस्ते त्यांच्या तैलचित्र प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले .त्यावेळी त्यांनी आदरणीय काकांविषयी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, कै. अमृतराव (काका) यांनी आजऱ्याच्या जडणघडणीत व विकासात मोलाचे कार्य केले आहे. त्यांनी आजरा राईस मिल ,जनता बँक, तालुका संघ उभारला तसेच आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी आजरा साखर कारखान्याच्या उभारणीचेही स्वप्न पाहिले. अशा त्यांच्या अनेक कार्यकर्तृत्वांचा आढावा घेतला.
संस्थान काळापासून आजरा येथे जाहीगिरदार घोरपडे सरकारांनी इचलकरंजी बरोबरच आजरा तालुक्यातील बहुजन समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी स्थापन केलेल्या व्यंकटराव हायस्कूल या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर करत आजच्या या शाळेत आपण सर्व संचालक आणि शिक्षकांच्या अथक प्रयत्नाने इयत्ता पहिली ते पदवीपर्यंत शिक्षण त्याचबरोबर ॲकॅडमीचे वर्गही नवीन उभारलेल्या तीन मजली इमारतीच्या एकाच छताखाली सुरू केले आहे.
या फोटो पूजन प्रसंगी आजरा महाल शिक्षण मंडळ आजराचे सचिव अभिषेक शिंपी , संचालक कृष्णा पटेकर, पांडुरंग जाधव , सचिन शिंपी सुधीर जाधव, विलास पाटील, पर्यवेक्षिका सौ व्ही जे शेलार, महाविद्यालयाचे प्राचार्य श्री पन्हाळकर सी.एस.,सर्व शिक्षक शिक्षकेतर वृंद व विद्यार्थी उपस्थित होते. काकांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी व्ही पाटील यांनी केले. आभार श्री डी आर पाटील यांनी मानले.
