जे. पी. नाईक पतसंस्थेचे खेळते भांडवल सुमारे ७० कोटींचे डिव्हीडंड १२ टक्के.- वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत
आजरा दि.२४ – प्रतिनिधी.
“आपल्या जे.पी. नाईक पतसंस्थेकडे रु. ६३ कोटी ठेवी आहेत तर कर्जे ५३ कोटी इतकी येणे आहेत. संस्थेने रु. १५ कोटींची गुंतवणुक केली असून दोन कोटींचा राखीव व इतर निधी आहे. भागभांडवल रु. एक कोटी सत्त्यात्तर लाख वर आहे. गतसालच्या आर्थिक व्यवहारातून सभासदांना १२ टक्के डिव्हीडंड देण्यात आला आहे. संस्थेच्या गडहिंग्लज व कोल्हापूर येथे दोन शाखा आहेत.
आजऱ्यासारख्या ग्रामीण भागात २४० कोटींची वार्षिक उलाढाल करणारी संस्था ही जनतेचा विश्वास व पारदर्शक कारभार यांचे दयोतक आहे. ही अभिमानास्पद बाब आहे. आमची संस्था अनेक सामाजिक उपक्रम राबवित असते.” पगारतारण सभासदांचा कर्जाचा व्याजदर ११ % दि. ०१/१०/२०२५ पासून करण्यात येणार असे उदगार संस्थेचा अहवाल मांडताना अध्यक्ष प्रा.डॉ. शिवशंकर उपासे यांनी सत्तावीसाव्या वार्षिक सभेत काढले.
प्रारंभी दीपप्रज्वलन करुन श्रध्दांजली वाहण्यात आली. संस्थेच्या सभासदांच्या दहावी व बारावी उत्तीर्ण विदयार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली. त्यानंतर संस्थेच्या सभासदांच्या एकसष्ठी व पंच्याहत्तरी निमित्त सत्कार करण्यात आला. तसेच विशेष कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा संचालक व सल्लागार मंडळातील सदस्यांनी गौरव केला.
सभेमध्ये उपाध्यक्ष सुभाष विभुते यांनी ताळेबंदपत्रक व पोटनियम दुरुस्ती, श्रावण जाधव यांनी नफातोटा पत्रक, शिवाजी बिद्रे यांनी नफा विभागणी, पुढील सालासाठी जमाखर्चाचे अंदाजपत्रक शिवाजी कांबळे यांनी, मागील सभेचे इतिवृत्त व लेखापरीक्षण अहवाल दोष दुरुस्ती वाचन जनरल मॅनेजर संतोष जाधव यांनी केले. सभेचे सूत्रसंचालन सुरेश दास यांनी केले. आभार शिवाजी बिद्रे यांनी मानले. सभा शांततेत व खेळमेळीच्या वातावरणात सभासदांनी पार पाडली. संचालक रवींद्र देसाई, प्रकाश ओतारी, मनोज गुंजाटी, पुष्पलता घोळसे व डॉ. अंजनी देशपांडे तसेच गडहिंग्लज व कोल्हापूर शाखांचे सल्लागार मंडळ व मान्यवर सभासद उपस्थित होते.
सभेचे संयोजन संजय तेजम, निकिता स्वामी, तुषार येरुडकर, उत्तम कुंभार, सतीश सुतार, सुभाष पाटील व प्रताप होलम यांनी केले.
