गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या गणेशभक्तांच्या खाजगी बसला कशेडी बोगद्याजवळ भीषण आग.- चालकाच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला
खेड :- प्रतिनिधी
गणेशोत्सवासाठी गावी कोकणात येण्यासाठी मुंबई- गोवा महामार्गावर सध्या वाहनांची मोठी गर्दी आहे. कोकणवासीय गावी दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. अशातच महामार्गावर मुंबईहून प्रवासी घेऊन कोकणात निघालेल्या एका खाजगी ट्रॅव्हल्स बसला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. बसला आग लागल्याची मोठी दुर्घटना शनिवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास घडली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे चालकाच्या प्रसंगावधानामुळे सगळे प्रवासी सुखरूप असून मोठा अनर्थ टळला आहे.
गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या गणेश भक्तांच्या लक्झरी बसला शनिवारी मध्यरात्री अचानक भीषण आग लागली. मुंबई – गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याच्या सुरुवातीला रायगड हद्दीत रात्री दोनच्या सुमारास बसने पेट घेतल्याची घटना घडली. लक्झरी बस कोकणाच्या दिशेने प्रवास करत असताना अचानक टायरचा मोठा आवाज झाला आणि टायर फुटला. चालकाच्या हा सगळा प्रकार लक्षात आला. त्याने तात्काळ प्रसंगावधान राखत बस थांबवली. सगळ्या प्रवाशांना बाहेर काढलं. त्यामुळे सगळे प्रवासी सुखरूप असून दैव बलवत्तर म्हणून मोठा अनर्थ, मोठी जीवितहानी थोडक्यात टळली आहे.
आगीची भीषणता इतकी होती की बसला आग लागल्यानंतर काही वेळातच बस पूर्णपणे जळून खाक झाली. या घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस आणि खेड व महाड नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. खेड येथील मदत ग्रुपचे प्रसाद गांधी यांच्या टीमनेही घटनास्थळी धाव घेतली मदत केली. मात्र या दरम्यान मुंबई – गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे ठप्प झाली होती. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महामार्गावर ही मोठी दुर्घटना घडली. बस आगीत भस्मसात झाली, बस जळून खाक झाल्याने मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. मात्र सर्व प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला आहे. या घटनेने प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं.
