🛑जिल्हा मध्यवर्ती बँकेतील ५० लाखांच्या सोन्याच्या चोरीचा पर्दाफाश.- शिपाई अवघ्या चार तासांत गजाआड
रत्नागिरी :- प्रतिनिधी

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्ला शाखेत तारण म्हणून ठेवलेले तब्बल ५० लाख रुपये किमतीचे ५०४.३४ ग्रॅम सोने चोरणाऱ्या बँकेच्या शिपायाला गुन्हे प्रकटीकरण शाखेने अवघ्या चार तासांत अटक केली. या प्रकरणात बँकेतील कॅशियर आणि मुख्य अधिकारी यांचेही संगनमत असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. हा सोन्याचा अपहार १८ फेब्रुवारी २०२५ ते ४ ऑगस्ट २०२५ या कालावधीत घडला. शुक्रवारी न्यायालयाने संशयित शिपायाला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
अमोल आत्माराम मोहिते (४२, रा. टिके, रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या शिपायाचे नाव आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सरव्यवस्थापक सुधीर प्रभाकर गिम्हवणेकर (५४) यांनी गुरुवारी दुपारी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
ग्राहकांकडून सोने तारण ठेवून जिल्हा मध्यवर्ती बँक कर्ज वाटप करते. हे दागिने बँकेच्या तिजोरीत सुरक्षित ठेवले जातात. मात्र, कर्जाची परतफेड झाल्यानंतर ग्राहकाने आपले दागिने सोडवायला आल्यावर त्याला दागिन्यांमध्ये कपात झाल्याचे दिसून आले. त्याने याबाबत वरिष्ठांना माहिती दिल्यानंतर सोन्याच्या अपहाराचा भांडाफोड झाला.
तपासात उघड झाले की, गेल्या सात महिन्यांत नागरिकांनी तारण ठेवलेल्या दागिन्यांमधून शिपाई अमोल मोहिते हा वेळोवेळी काही दागिने चोरत होता.बँक व्यवस्थापनाच्या तक्रारीनंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेने तातडीने तपास सुरू केला आणि अवघ्या चार तासांत संशयित शिपायाला बेड्या ठोकल्या.
🟥ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश माईनकर, शहर पोलिस निरीक्षक विवेक पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक केदार वायचळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.या मोहिमेत सहाय्यक पोलिस फौजदार दिपक साळवी, पोलिस हेड काँस्टेबल पंकज पडेलकर, अमोल भोसले, आशिष भालेकर, अमित पालवे आणि महिला पोलिस शिपाई अमिता पाटील यांनी सहभाग घेतला.