🟥एसटी कर्मचाऱ्यांचा पगार या तारखेला होणार.- कर्मचाऱ्यांचा यंदाचा गणेशोत्सव आनंदात जाणार
🟣महिलेला शॉक देऊन मारण्याचा प्रयत्न फसला.- घोटगे येथील घटना
🟥जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित करावे.
🟥एसटी कर्मचाऱ्यांचा पगार या तारखेला होणार.- कर्मचाऱ्यांचा यंदाचा गणेशोत्सव आनंदात जाणार
मुंबई :- प्रतिनिधी
गणेशोत्सव साजरा करताना एसटी कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे. गणेशोत्सवानिमित्त राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा पगार उद्याच होणार आहे. दर महिन्याला पगार उशिरा मिळण्याची सवय झालेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांचा यंदाचा गणेशोत्सव आनंदात जाणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पुढाकार घेतला असून कर्मचाऱ्यांचे वेतन बाप्पाच्या आगमनाआधीच म्हणजे उद्याच खात्यात जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार गणेशोत्सवासाठी या महिन्यात लवकर म्हणजे उद्या केला जाणार आहे. त्याप्रमाणं एसटी कर्मचाऱ्यांना देखील पगार लवकर देण्यासाठी सरकार प्रयत्नशील होतं. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील एस टी कर्मचारी पगाराची फाईल मागच्या आठवड्यात वित्त विभागाकडे पाठवली होती आणि लवकर निधी देण्याचे मागणी केली होती. एसटी कर्मचाऱ्यांच्या त्या मागणीला यश आले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना देखील उद्या पगार मिळणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्यात 7 ते 10 तारखेपर्यंत पगार दिला जातो. मात्र, या महिन्यात खास बाप्पासाठी परिवहन मंत्रांनी लवकर पगार करण्याचे दिले आदेश दिले आहेत.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला जुलै महिन्याच्या सवलतमूल्याच्या प्रतिपूर्तीपोटी 477.25 कोटी रुपये देण्यास मान्यता देण्यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. यामुळं एसटी कर्मचाऱ्यांच्या ऑगस्ट महिन्याच्या वेतनाचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार उद्या होणार असल्याचं जाहीर केलं आहे. अजित पवार यांनी सोशल मीडियावर यासंदर्भातील पोस्ट केली आहे. अजित पवार म्हणाले, श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तमाम सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांचं वेतन आणि निवृत्ती वेतन हे उद्या, अर्थात 26 ऑगस्टला त्यांच्या बँक खात्यात जमा होईल.
🟥महिलेला शॉक देऊन मारण्याचा प्रयत्न फसला.- घोटगे येथील घटना
कुडाळ :- प्रतिनिधी
कुडाळ तालुक्यातील घोटगे ख्रिश्चनवाडी येथे राहणाऱ्या महिलेला काल (रविवारी) रात्री शॉक देऊन मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याबाबत प्राप्त माहितीनुसार, लीना जोसेफ लॉन्ड्रीक्स ही महिला एकटीच राहत असून मध्यरात्री १ च्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने तिच्या घरावर चढून तिला काठीच्या मदतीने विजेच्या शॉक देऊन मारण्याचा प्रयत्न केला. याबाबत कुडाळ पोलीस प्रशासनाला माहिती देण्यात आली आहे. याबाबत स्थानिक नागरिक आक्रमक झाले असून ही घटना चोरीच्या उद्देशाने केली असावी, असा अंदाज आहे.याबाबत अज्ञात व्यक्तीचा श्वानपथक आणून त्याचा तपास करण्याची मागणी केली आहे.
🟥जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित करावे.
मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई : – प्रतिनिधी

जगद्गुरू रामानंदाचार्यजी नरेंद्राचार्यजी यांना महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेला ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ प्रदान करण्याची विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केली आहे.
याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रानुसार ना. नितेश राणे यांनी म्हटले आहे की, रत्नागिरी येथील नाणीज येथील दक्षिण पिठाचे रामानंदाचार्य जगद्गुरू संत श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचे आध्यात्मिक तसेच सामाजिक क्षेत्रातील योगदान मोठे आहे. त्यांचे धार्मिक, सांस्कृतिक आणि समाजजागृतीचे कार्य अविरत सुरू असून, महाराष्ट्रासह संपूर्ण राष्ट्राला याचा अभिमान आहे. गेल्या अनेक दशकांपासून त्यांच्या निःस्वार्थ सेवा आणि समर्पित प्रयत्नांमुळे समाजावर सकारात्मक परिणाम झाला आहे.
त्यांनी दोन पिढ्यांना धार्मिक प्रेरणा दिली असून समाजात नैतिक मूल्यांची जपणूक केली आहे. महाराष्ट्राच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उन्नतीसाठी तसेच लोककल्याणासाठी त्यांनी केलेली कार्ये अत्यंत अनन्यसाधारण आहेत. त्यांच्या आयुष्यभराच्या आध्यात्मिक साधनेसाठी व समाजसेवेसाठी त्यांना हा पुरस्कार देणे हे निश्चितच गौरवाचे ठरेल, अशा शब्दांत ना. नितेश राणे यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी केली असून जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींचा कार्याचा गौरव केला आहे.