🟥अखेर दादरचा कबुतरखाना झाला बंदिस्त!
🟥बीडमध्ये मनोज जरांगे असलेल्या लिफ्टचा अपघात.- लिफ्ट जमिनीवर कोसळली.
मनोज जरांगे सुखरूप.- दरवाजा तोडून सर्वांना बाहेर काढलं..
🟥अखेर दादरचा कबुतरखाना झाला बंदिस्त!
मुंबई :- प्रतिनिधी

न्यायालयाच्या आदेशानुसार, कबुतरांना दाणे, खाद्यपदार्थ खायला घालण्यास मनाई आहे. मात्र तरीही कबुतरप्रेमी कबुतरांना दाणे खायला घालत असल्याचे निदर्शनास येते आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने शुक्रवारी रात्री तर शनिवारी सांयकाळी कबुतरखान्यावर कारवाईचा प्रयत्न केला असता, जैन समाजातील नागरिकांसह कबुतरप्रेमींनी विरोध दर्शवला.
मात्र शनिवारी सायंकाळी उशिराने महापालिकेच्या कर्मचार्यांनी पोलिस बंदोबस्तात दादर येथील कबुतरखाना जाळी आणि बांबूच्या ताडपत्रीने बंदिस्त केला. तसेच, कबुतरांना दाणे टाकणार्यांवर नजर ठेवण्यासाठी चारही बाजूने सी. सी कॅमेरे बसविण्यात आले. या कारवाईमुळे रात्री उशिरापर्यंत कबुतरखाना परिसरात स्थिती तणावपूर्ण होती. कडक पोलीस बंदोबस्त पालिकेने कारवाई फत्ते केली.
गेल्या महिन्यांत पालिका जी/ उत्तर विभागाने दादर कबुतरखान्यावरील लोखंडी शेड, लगतचे पत्रे काढले होते. तसेच साचून ठेवलेले धान्य जप्त केले होते. मात्र त्यानंतरसुध्दा कबुतरांना दाणे टाकणे सुरूच होते.
दादर कबुतरखाना येथे कबुतरांना दाणे घालणे बंद करण्यासाठी महापालिकेचे पथक शुक्रवारी रात्री उशिराने कारवाईसाठी गेले होते. मात्र त्यावेळी काही कबुतरे आजारी असल्याने त्यांचा विचार करता तूर्तास कारवाई करू नका, असे सांगत कबुतरप्रेमींनी मुदत मागून घेतली होती.तसेच पालिकेच्या कारवाईला विरोध दर्शवला होता. त्यामुळे पालिका पथकाला माघारी परतावे लागले होते. मात्र शनिवारी सायंकाळी पुन्हा उशिरा पालिकेच्या पथकाने कबुतरांना दाणे टाकण्याच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्तात धडक देत कारवाईला सुरुवात केली. त्या दरम्यानही परिस्थिती तणावपूर्ण झाली होती. मात्र पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. आणि कारवाई करून पालिका मोकळी झाली.
🟥बीडमध्ये मनोज जरांगे असलेल्या लिफ्टचा अपघात.- लिफ्ट जमिनीवर कोसळली.
मनोज जरांगे सुखरूप.- दरवाजा तोडून सर्वांना बाहेर काढलं
बीड :- प्रतिनिधी.

बीडमधून मोठी बातमी समोर येत आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील प्रवास करत असणाऱ्या लिफ्टचा अपघात झाला आहे. मनोज जरांगे लिफ्टमध्ये असताना ती लिफ्ट थेट जमिनीवर कोसळली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. या अपघातातून मनोज जरांगे सुखरुप बचावल्याची माहिती मिळत आहे. लिफ्टचा दरवाजा तोडून सर्वांना बाहेर काढण्यात आले आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, बीडमध्ये मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे एका रुग्णाला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आले होते. बीडमधलं एक मोठं शिवाजीराव क्रिटिकल केअर नावाचां हॉस्पिटल आहे. या रुग्णालयात ही घटना घडली आहे. या रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या एका रुग्णाला भेटण्यासाठी मनोज जरांगे पाटील जात होते. मात्र मनोज जरांगे पाटील हे आपल्या सहकाऱ्यांसह लिफ्टने पहिल्या मजल्यावर जाताच लिफ्ट अचानक बंद झाली, आणि ती पहिल्या मजल्यावरून थेट ग्राऊंड फ्लोअरला येऊन आदळली. जेव्हा हा अपघात झाला तेव्हा त्या लिफ्टमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्यासह त्यांचे काही सहकारी देखील होते, त्या सर्वांना लिफ्टचा दरवाजा तोडून बाहेर काढण्यात आलं.
मनोज जरांगे पाटील हे रुग्णाला भेटायला जात असताना पहिल्या मजल्यावर ही लिफ्ट अचानक बंद पडली, त्यानंतर ती पहिल्या मजल्यावरून थेट जमिनीवर आदळली. या घटनेमुळे रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. या लिफ्टमध्ये अडकलेले मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना लिफ्टचा दरवाजा तोडून बाहेर काढण्यात आलं. सुदैवानं या अपघातामध्ये कोणीही जखमी झालेलं नाही. सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. पुन्हा एकदा मराठा बांधवांचा मोर्चा मुंबईमध्ये धडकणार आहे. या आंदोलनाची तयारी सध्या सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांच्याकडून बैठकांचा धडाका सुरू आहे. मागील आंदोलनापेक्षा हे आंदोलन पाच पटीनं मोठं असेल असंही त्यांनी म्हटलं आहे.