💥वैद्यकीय क्रांती.- ना वेदना, ना सूज,आरोग्य सेवेतील मोठी क्रांती.- सुईशिवाय इंजेक्शन देण्याची प्रणाली नागपूर शहरात सुरू
नागपूर :- प्रतिनिधी.
सुईचा टोचून घेण्याचा साधा विचार जरी मनात आला, तरी अनेकांच्या अंगावर काटा येतो. विशेषतः लहान मुलांना इंजेक्शनची भीती असतेच, पण काही प्रौढही सुईपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. याच पार्श्वभूमीवर नागपूर शहरात आरोग्य सेवेत एक मोठी क्रांती घडली आहे. आता सुईशिवाय इंजेक्शन देण्याची प्रणाली नागपुरात सुरू झाली असून, यामुळे उपचार अधिक सुलभ, वेदनारहित आणि सुरक्षित बनणार आहेत.
सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांच्या पुढाकाराने हे सुई-मुक्त इंजेक्शन नागपुरात दाखल झाले आहे. डॉक्टर अविनाश गावंडे यांनी या तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक करून दाखवले आहे. या नव्या पद्धतीत जेट इन्फ्युझन तंत्रज्ञान” वापरले जाते. या तंत्राद्वारे औषध एका विशेष पिस्टल सदृश्य उपकरणाद्वारे त्वचेतून ४ सेंटीमीटर खोल मसल्समध्ये प्रवेश करते. इंजेक्शन देताना कोणतीही सुई वापरली जात नाही. उच्च दाबाचा वापर करून औषध त्वचेच्या आत सोडले जाते. त्यामुळे या पद्धतीत ना सुईची भीती, ना वेदना, ना सूज. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संसर्गाचा धोका अत्यंत कमी आहे.
डॉ. गावंडे यांच्या म्हणण्यानुसार, सामान्य इंजेक्शनमध्ये कधी कधी नसांना इजा, टिश्यू डॅमेज, किंवा संसर्ग होण्याची शक्यता असते. परंतु सुईविना दिल्या जाणाऱ्या इंजेक्शनमध्ये हे धोके जवळजवळ नाहीसे होतात. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगटांमध्ये ही पद्धत फायदेशीर आहे. या पद्धतीद्वारे इंट्रामस्क्युलर आणि सबक्युटेनस प्रकारच्या इंजेक्शन्स दिले जातात. विशेषतः लसीकरण, इन्सुलिन इत्यादींच्या वापरात याचे महत्त्व वाढत आहे. मात्र, तेलयुक्त औषधांसाठी ही पद्धत उपयुक्त नाही, असेही डॉ. अविनाश गावंडे यांनी स्पष्ट केले. लहान मुलांपासून वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत या तंत्रज्ञानाचे चाचणीआधारित प्रयोग झाले असून, याचे परिणाम समाधानकारक आहेत. यामुळे भविष्यात या पद्धतीचा वापर अधिक व्यापक प्रमाणावर होण्याची शक्यता आहे. सुईची भीती दूर करत सुरक्षित आणि वेदनारहित उपचार देणारे हे तंत्रज्ञान नागपूरच्या आरोग्य क्षेत्रात एक नवीन वाट निर्माण करत आहे.