मुंबई. प्रतिनिधी.०६.
सर्वसामान्य जनतेला रेल्वे प्रवासाची मुभा मिळावी म्हणून भारतीय जनता पक्षाने आज मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जेलभरो आंदोलन केलं. चर्चगेट, चर्नी रोड आणि कांदिवली रेल्वे स्थानकात शेकडो भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते जमले. यावेळी आंदोलकांनी ठाकरे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत रेलभरो आंदोलन केलं.
बस आणि विमानातून प्रवास करण्याची मुभा देण्यात येते. मग रेल्वेतून प्रवास का करू दिला जात नाही?, सर्वसामान्यांनी काय घोडं मारलं? असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला.विनातिकीट प्रवास केल्याप्रकरणी दरेकर यांना रेल्वेकडून 260 रुपयांचा दंड आकारण्यात आला.भारतीय जनता पक्षाचे नेते प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वात ही आंदोलने करण्यात आली. यावेळी आमदार मंगलप्रभात लोढाही उपस्थित होते. तर आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलेले आमदार राहुल नार्वेकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. तर, कांदिवलीत आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. यावेळी शेकडो भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते जमले होते. यावेळी आंदोलकांनी प्लॅटफॉर्मवर जाऊन जोरदार घोषणाबाजी केली. सर्व सामान्यांसाठी लोकल प्रवास सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.