Homeकोंकण - ठाणेस्वतः ऐवजी देशाचा विचार सर्वप्रथम केला तर सर्वच प्रश्न मार्गी लागतील.- भय...

स्वतः ऐवजी देशाचा विचार सर्वप्रथम केला तर सर्वच प्रश्न मार्गी लागतील.- भय आणि भ्रष्टाचार मुक्त राजकारणासाठी श्री. प्रल्हाददादा पै यांची महत्वपूर्ण सूचना.

मुंबई. प्रतिनिधी.

आपल्या देशात भय आणि भ्रष्टाचार मुक्त राजकारण योग्य पद्धतीने अंगिकारण्यात आले आणि स्वतः ऐवजी देश हा सर्वप्रथम असा विचार सर्वच लोकप्रतिनिधींनी केला तर विश्वभरात भारताला महासत्ता होण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही, यासाठी जीवनविद्या मिशनचे प्रणेते सद्गुरु वामनराव पै यांनी मांडलेला सिद्धांत हाच सर्वोत्तम आहे, असे सुस्पष्ट प्रतिपादन जीवनविद्या मिशनचे आजीव विश्वस्त श्री. प्रल्हाद दादा पै यांनी केले. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी यांनी लिहिलेल्या ‘गुरुजी’ या दुसऱ्या पुस्तकाचे प्रकाशन बोरीवली येथील जीवनविद्या मिशनच्या मुख्य कार्यालयात मिशनचे आजीव विश्वस्त श्री. प्रल्हाद दादा पै यांच्या शुभहस्ते एका छोटेखानी कौटुंबिक आणि उत्साहवर्धक वातावरणात करण्यात आले. त्यावेळी श्री. प्रल्हाददादा वामनराव पै यांनी देशातील संपूर्ण राजकारणात भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त वातावरण कसे निर्माण होईल, यासाठी जीवनविद्या मिशनचे प्रणेते सद्गुरु वामनराव पै यांचा सिद्धांत, त्यांचे तत्त्वज्ञान किती समर्पक आणि चपखलपणे योग्य आहे ते समजावून सांगितले. सदगुरुंनी सर्वात आधी देश आपल्या डोळ्यासमोर अग्रस्थानी ठेवला. देशाचे भले झाले तर आपोआप आपले भले होईल. आपण जे कार्य करतो हे देशासाठी समजून करावे. देशाचे भले करणे हेच उद्दिष्ट समोर ठेवणे आवश्यक आहे. ‘नेशन फर्स्ट’ ही संकल्पना पुढे न्यायला हवी. देश सुधारला, देशाची प्रगती झाली तर पर्यायाने आपली प्रगती निश्चितच होईल. देश आणि समाज आपण नेहमीच आपल्या डोळ्यासमोर ठेवला पाहिजे, समाजाशी आपली बांधिलकी आहे आणि समाजाची प्रगती म्हणजे पर्यायाने देशाचीच प्रगती, देश, समाज जर पुढे गेला तर आपणही पुढे जाऊ शकतो. मी, नको आम्ही पण नको तर ‘सर्व ‘ हे महत्त्वाचे आहे, सर्वांमध्ये आपणही आलोच. जीवनविद्या मिशनच्या विश्वप्रार्थने मध्ये सर्वांचे भले चिंतले आहे. सर्वांच्या भल्यात आपलेही भले आहे. निवडणुकीच्या राजकारणावर कटाक्ष टाकतांना श्री. प्रल्हाददादा पै म्हणाले की, आपण पक्षाच्या चिन्हावर मतदान करतो. पक्षाला निवडून देतो. मग अशावेळी जर एखाद्या लोकप्रतिधीने पक्ष सोडला तर त्याची निवड रद्दबातल करण्यात आली पाहिजे आणि त्या लोकप्रतिनिधीच्या जागी पक्षाने दुसऱ्या योग्य व्यक्तीला नियुक्त केले पाहिजे, ‘नॉमिनेट’ केले पाहिजे. म्हणजे मग पक्षांतराला आळा बसू शकेल. पक्ष हाच महत्त्वाचा असल्याने पक्षाने दुसऱ्या योग्य व्यक्तीची नियुक्ती केली तर खर्च सुद्धा वाचू शकेल. भ्रष्टाचार या प्रवृत्तीला आळा बसू शकेल. लोकशाहीच्या चारही स्तंभांनी प्रामाणिकपणे, जबाबदारीने कार्यरत राहून देश हाच केंद्रबिंदू मानून देशाच्या विकासाचा द्रुष्टिकोन बाळगला तर भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त वातावरण देशात निर्माण होण्यास चालना मिळेल, असेही श्री. प्रल्हाददादा पै यांनी नीक्षून सांगितले. यावेळी योगेश वसंत त्रिवेदी यांनी श्री. प्रल्हाददादा पै यांचा शाल, श्रीफळ देऊन तर श्री. प्रल्हाददादा पै यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. ‘आहुति’चे संपादक गिरीश वसंत त्रिवेदी व कार्यकारी संपादिका सौ. मनीषा त्रिवेदी यांनी ‘आहुति’चे विविध विशेषांक आणि ‘शेतीजन्य’ची भेट श्री. प्रल्हाददादा पै यांना सादर केली. जीवन विद्या मिशन ग्राम समृध्दी अभियान संपूर्ण महाराष्ट्रात राबवित आहे त्याच्याशी सुसंगत शेतीजन्य हा उपक्रम कौतुकास्पद आहे.असे ते म्हणाले.सद्गुरु वामनराव पै यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. जीवनविद्या मिशनचे विश्वस्त सचिव दिपक काळे, प्रा. सौ. नयना रेगे व अन्य पदाधिकारी, नामधारक, सौ माया योगेश त्रिवेदी, सौ देवांशी प्रशांत त्रिवेदी , चि. वेद प्रशांत त्रिवेदी, राजा शिवछत्रपती परिवारच्या मुंबई संपर्क प्रमुख रेखाताई बोऱ्हाडे यावेळी उपस्थित होते. विश्वप्रार्थनेने प्रकाशन समारंभाची सांगता करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.