🛑मरणयातना.- स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा नंतरही धनगरवाडी अंधारातच
🟥हिंदी भाषा सक्तीची करुन दाखवावी, फक्त दुकानंच नाही तर शाळाही बंद करू.- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा सरकारला इशारा
💥दिव्यांगांना दरमहा २ हजार ५०० रुपये मिळणार.- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.- पहा अधिक
🛑वारस तपासासाठी लाच घेताना तलाठयाला पकडले रंगेहात.- लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई.
💥मरणयातना.- स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा नंतरही दख्खन पुर्व धनगरवाडी अंधारातच
( मी हयात असेपर्यंत तरी वीज घरी पोहचेल का? वृध्देचा शासनाला उद्वीग्न सवाल.)
{सध्याच्या पिढीला सोयीअभावी भोगाव्या लागताहेत मरणयातना }
साखरपा :- प्रतिनिधी.

आंबा घाटातील एका दरीत वसलेली संगमेश्वर तालुक्यातील दख्खन धनगरवाडी पूर्व ९ कुटुंब असलेली लोकवस्ती. मात्र जागेअभावी वस्तीपर्यंत रस्ता पोहचला नाही परिणामी महावितरणला परवडत नाही म्हणून वीज नाही. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा नंतरही दख्खन पूर्व धनगरवाडी अंधारातच आहे. नागरी सुविधा पासून वंचित असल्याने तात्पुरत्या स्वरूपात अनेक कुटुंबे स्वतःच घर-दार शिवार सोडून स्थलांतरीत झाली आहेत. मात्र परिस्थिती अभावी इथल्याच मातीत रहाणं भाग पडलेलं कुटुंब आदिवासी जीवन जगत आहेत. आंबा घाटातील कळकदरा स्टॉपच्या पश्चिमेला एका खोल दरीत धनगरवाडी पूर्व गावची लोकवस्ती आहे. धनगर बांधवांचा शेती आणि पशुपालन हा प्रमुख व्यवसाय असल्याने जनावरांना पुरेसा चारा मिळावा यासाठी पूर्वजांनी या ठिकाणाची निवड केली. मात्र सध्याच्या पिढीला सोयीअभावी मरणयातना भोगाव्या लागत आहेत.
वस्तीत वीजपुरवठा व्हावा यासाठी रीतसर मागणी आणि ७ कुटुंबांनी वीज मीटरची २०१७ साली देयक भरणा केले. मात्र या प्रकारास आठ वर्षे उलटून गेली तरी अंमलबजावणीचा पत्ता नाही. लोकशाही दिनात सुद्धा या विषयावर आवाज उठविण्यात आला होता. मागील वर्षी देवरूख येथे झालेल्या जनता दरबारात गावचे पोलीस पाटील रविंद्र फोंडे यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर महावितरणची टीम घटनास्थळी भेट देऊन केवळ पाहणी करून गेली. आधुनिक युगात वीजे शिवाय पर्याय नाही. मात्र या वाडीतील नवीन पिढीतील कुटुंबांना विजेच्या सोयी अभावी एक एक करत घरं दारं शेत शिवार मनाविरूद्ध सोडावं लागलं.
मात्र परिस्थिती अभावी ९० वर्षाची वृद्धा, तिचा मुलगा, सुन आणि तीन सहा वर्षाखालील नातवंडे असे ६ जण प्रतिकूल परिस्थिती वर मात करत हलाखीचे जीवन जगत आहेत. सभोवती घनदाट जंगल, बिबटे, रान रेडे, कोल्हे, कोळसुंदे अशी हिंस्त्र श्वापदे यांचा मुक्त वावर त्यातच रात्रभर पूर्ण अंधार. अशा भयावह परिस्थितीशी तोंड देत एक एक दिवस पुढे ढकलणाऱ्या या कुटुंबाच्या घरी वीज कधी पोहचणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर मी हयात असेपर्यंत वीज पोहचेल का? असा उद्विग्न सवाल येथील बनाबाई पांडुरंग फोंडे या वृद्ध महिलेने विचारला आहे. या वृद्धेची आर्त हाक शासन दरबारी पोहचते का? यासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे.
🟥हिंदी भाषा सक्तीची करुन दाखवावी, फक्त दुकानंच नाही तर शाळाही बंद करू.- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा सरकारला इशारा
मुंबई :- प्रतिनिधी.

सरकारने पहिली ते पाचवीपर्यंत हिंदी भाषा सक्तीची करुन दाखवावी. आम्ही फक्त दुकानंच नाही तर शाळाही बंद करु, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. मीरा भाईंदरमध्ये राज ठाकरे यांची विराट सभा पार पडली. या सभेत राज ठाकरेंनी हिंदी भाषा सक्तीच्या मुद्यावर महायुती सरकारवर जोरदार प्रहार केला.
राज्य सरकारने म्हणे पहिलीपासून हिंदी शिकलीच पाहिजे. त्या निर्णयापासून हे सगळं सुरू झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल म्हणाले, तिसरी हिंदी भाषा सक्तीची करणार म्हणजे करणार. आता राज्य सरकारला आत्महत्या करायची असेल तर त्यांनी करावी. नुसता त्या दिवशी मोर्चाच्या धसक्याने निर्णय मागे घ्यावा लागला, फडणवीसजी, तुम्ही म्हणताय ना तिसरी भाषा हिंदी आणणार म्हणजे आणणार, तर मी आता सांगतो, पहिली ते पाचवी हिंदी आणण्याचा प्रयत्न करून तर बघा, दुकानं नाही शाळा सुद्धा बंद करेल. मुख्यमंत्री हिंदीसाठी भांडतो. महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी भांडतोय. इतर अमराठी शाळा आहे तिथे मराठी आणण्याचं सोडून तुम्ही हिंदीसक्ती आणण्याचा दबाव टाकत आहात, तो सहन केला जाणार नाही, असे राज ठाकरे म्हणाले.
हिंदी भाषेला 200 वर्षांचा इतिहास आहे. मराठी भाषेला अडीच हजार वर्षांचा इतिहास आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलाय, वर्ष झालंय पण एक रुपया दिलेला नाही. हिंदी भाषेमुळे हिंदी चित्रपटसृष्टीतील नट-नट्यांचं भलं झालं, अन्य कुणाचं भलं झालं ते मला सांगा ? हिंदी भाषेमुळे कुणाचं भलं झालं आहे? त्यासाठी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पेटलाय? अशी टीका राज यांनी केली. हिंदी भाषेनं 250 भाषा मारुन टाकल्या. बिहारमध्ये त्यांनी हिंदी भाषा स्वीकारली. तिथं आजही 99 टक्के लोकं मातृभाषा बोलतात.भाषा कोणतीही वाईट नसते. हिंदीही वाईट भाषा नव्हे, आमच्यावर लादणार असाल तर नाही बोलणार जा, असंही राज यांनी यावेळी सांगितलं.
आम्ही हिंदू आहोत, हिंदी नव्हे. पण हिंदुत्वाच्या बुरख्यातून तुम्ही हिंदी लादणार असाल तर माझ्यासारखा कडवट मराठी तुम्हाला सापडणार नाही. पालघरसह मीरा रोडपर्यंतचा संपूर्ण पट्टा हिंदी भाषिक करण्याचा त्यांचा डाव आहे. त्यामाध्यमातून हा संपूर्ण पट्टा गुजरातला जोडण्याचा त्यांचा कट आहे, असा आरोप राज यांनी केला. आम्ही गुलाम नाही. या प्रांतावर आमचा अधिकार आहे. मराठे अटकेपार पोहोचले होते, हा इतिहास आहे. तो महाराष्ट्र हतबल आहे का? बाकीचे माणसं बाहेरुन आले ती तुमच्यासमोर रुबाब करणार. स्वत:हून काही करण्याची गरज नाही. पण, असा कुणी माज घेऊन आला तर त्याला ठेचायचा म्हणजे ठेचायचाच तुमची सत्ता लोकसभेत आणि विधानभवनात आहे. आमची सत्ता रस्त्यावर आहे, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
🟥दिव्यांगांना दरमहा २ हजार ५०० रुपये मिळणार.- अधिवेशनात १६ विधेयके पास.- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती.
मुंबई :- प्रतिनिधी.

पावसाळी अधिवेशनाचा समारोप झाला आहे. अधिवेशनात १६ विधेयकं आम्ही पास केली असल्याचे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडत आहे. ९३ टक्के पाऊस आतापर्यंत पडला आहे. धरणात चांगला साठा आहे. खरिपाचा हंगाम यंदा चांगला असेल. पावसाची कामगिरी दमदार आहे तशीच आमच्या सरकारची देखील दमदार आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्रातील 11 किल्ले आणि तामिळनाडूतील जिंजी अशा 12 किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे. सरासरीपेक्षा अधिक पाऊस आता पडत आहे. 93 टक्के पाऊस आतापर्यंत पडला आहे. पंचनामे करण्याचे आदेश दिलेत, काही भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. नुकसान झालेल्यांना पैसे वाटप करतोय. धरणात चांगला साठा आहे. खरिपाचा हंगाम यंदा चांगला असेल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. एससीएसटी समाजाच्या आयोगांना वैधानिक दर्जा दिला आहे. जनसुरक्षा विधेयक यासंदर्भात अनेक अफवा पसरवण्यात आल्या आहेत. सगळ्या बैठका समितीच्या खेळीमेळीत पार पडल्या. ज्या सुराधणा सुचवल्या त्याच क्षणी त्या स्वीकारल्याचे फडणवीस म्हणाले. नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण आपण केलं आहे. गडचिरोली जिल्हा खनिकर्म प्राधिकरण विधेयक मंजूर केलं आहे. मकोकात आता नार्कोटिक्स घेण्याचे देखील ठरवले आहे. पुरवणी मागण्यांना मान्यता देण्यात आली असल्याचे फडणवीस म्हणाले.
राज्य सरकारनं दिव्यांगांसाठी आता अडीच हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.तसेच शिक्षकांना देखील अनुदान दिले आहे. तसेच भूषण गवईंचा यांचे देखील सत्कार आपण केला आहे. अनुकंपाची यादी समाप्त करण्याचा निर्णय मंत्रीमंडळाने घेतला आहे. संत सावता महाराज समाधी मंदिर विकासासाठी मान्यता देण्यात आली आहे. विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरं देण्यात आली असल्याचे फडणवीस म्हणाले.
सत्तारुढ पक्ष म्हणून झालेल्या कामकाजावर आम्ही समाधानी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. राज्याची पुढची वाटचाल कशी असणार याबाबतही चर्चा झाली. मात्र, हे खरे आहे की, काही गोष्टी अशा घडल्या की, त्या गोष्टीचं आम्हाला देखील दु:ख आहे. अशा गोष्टी घडू नये म्हणून भविष्यात काळजी घेतली जाईल असे मुख्यमंत्री म्हणाले. विरोधकांनी कोणतेही पुरावे न देता आरोप केला. आरोप करायचे आणि त्यातून बाजूला व्हायचे ही विरोधकांची भूमिका होती असे फडणवीस म्हणाले.
🟥वारस तपासासाठी लाच घेताना तलाठयाला पकडले रंगेहात.- लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई
मालवण :- प्रतिनिधी.

जमिनीच्या वारस तपासणीसारख्या सामान्य कामासाठीही सर्वसामान्यांकडून लाच घेण्याचे प्रकार तलाठयांकडून सुरूच असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. मालवण येथील मसुरे तलाठी निलेश किसन दुधाळ (वय २६) याला सिंधुदुर्ग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे. या घटनेमुळे महसूल विभागातील भ्रष्टाचाराचा किळसवाणा चेहरा पुन्हा समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन अर्जदारांनी जमिनीच्या वारस तपासणीसाठी सर्व आवश्यक कागदपत्रे एका व्यक्तीमार्फत तलाठी कार्यालयात जमा केली होती. मात्र, हे अर्ज अनेक दिवस प्रलंबित होते.याबाबत तलाठी दुधाळ यांच्याकडे विचारणा केली असता, त्याने प्रत्येक वारस तपासणी अर्जासाठी २ हजार रुपये, असे एकूण ४ हजार रुपयांची मागणी केली. लाच मागितल्याने संतप्त झालेल्या अर्जदारांनी थेट सिंधुदुर्ग लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार केली.या तक्रारीची गंभीर दखल घेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे, निलेश दुधाळ हा ४ हजार रुपये स्वीकारत असतानाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. या घटनेनंतर दुधाळला तात्काळ ताब्यात घेण्यात आले असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक विजय पांचाळ यांनी दिली.
शासकीय कार्यालयांमध्ये सामान्य माणसांची कामे वेळेत आणि विनासायास होणे अपेक्षित असताना, अनेकदा लाचेशिवाय काम होत नाही, असा अनुभव नागरिकांना येतो. तलाठी दुधाळसारख्या तरुण अधिकाऱ्यानेही तात्पुरत्या पैशासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याने सर्वसामान्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या कारवाईमुळे नागरिकांच्या मनात थोडा दिलासा मिळाला असला तरी, महसूल विभागातील हा खोलवर रुजलेला भ्रष्टाचार कधी संपुष्टात येणार, असा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक विजय पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रीतम कदम, जनार्दन रेवंडकर, गोविंद तेली, विजय देसाई, अजित हंडे, स्वाती राऊळ, योगेश मुंडे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक संजय गोविलकर आणि सुहास शिंदे यांनीही या कारवाईसाठी मार्गदर्शन केले.