🟥मुंबई विमानतळावरून आयएसआयएसशी संबंधित दोघांना अटक.- दोघांवरही ३
🛑यंदा समुद्राला पावसाळ्यात १८ दिवस मोठी भरती! – २६, २७ जून जुलैला सर्वात मोठी उधाणं!!
🛑देशातील बँकांचीच १.१० लाख कोटींनी फसवणूक!
सामान्यांच्या पैशांची सुरक्षितता काय?
🟥मान्सूनचा प्रवास सुसाट.- महाराष्ट्रात वेळेआधीच धडकणार.- मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण
🟥मुंबई विमानतळावरून आयएसआयएसशी संबंधित दोघांना अटक.- दोघांवरही ३ लाखांचे बक्षीस !
मुंबई :- प्रतिनिधी.
राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पुणे येथे २०२३ मध्ये आईडी प्रकरणात दोन फरार आरोपींना मुंबई विमानतळावरून अटक केली. हे दोघेही प्रतिबंधित दहशतवादी संघटना आयएसआयएस स्लीपर मॉड्यूलशी संबंधित असल्याची माहिती एनआयएकडून देण्यात आली. अब्दुल्ला फैयाज शेख उर्फ डायपरवाला आणि तल्हा खान अशी अटकेत असलेल्या दोघांची नावे आहेत.
हे दोघेही जकार्ता, इंडोनेशिया येथे लपून बसले होते आणि भारतात परतण्याचा प्रयत्न करत असताना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (टी२) इमिग्रेशन विभागाने त्यांना अडवले. त्यानंतर एनआयएच्या पथकाने त्यांना ताब्यात घेऊन अटक केली. हे दोघेही गेल्या दोन वर्षांपासून फरार होते. मुंबईतील एनआयए विशेष न्यायालयाने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट्सही जारी केले होते. तसेच, दोघांवर माहिती देणाऱ्याला प्रत्येकी ३ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
🟥या प्रकरणात अटक करण्यात आलेले आणखी आठ आरोपी आहेत, जे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. हे सर्व आरोपी आयएसआयएसच्या विचारसरणीनुसार भारतात दहशतवादी कारवाया घडवून आणून देशात शांतता आणि सामाजिक सलोखा बिघडवण्याच्या कटात सहभागी होते. त्यांनी हिंसाचार व दहशतीच्या मार्गाने भारत सरकारविरोधात युद्ध पुकारून देशात इस्लामिक राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता.
अब्दुल्ला फैयाज शेख याने पुण्यातील कोंढवा भागात भाड्याने घेतलेल्या घरातून त्यांनी स्फोटके तयार केली होती. २०२२ ते २०२३ या कालावधीत या ठिकाणी बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण शिबिर घेतले गेले होते, तसेच त्यांनी बनवलेल्या आयईडीचे नियंत्रणीत स्फोट घडवून आणून त्याची चाचणीही घेतली होती.
या प्रकरणात एनआयएने याआधीच १० आरोपींविरोधात बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (यूएपीए), स्फोटके अधिनियम, शस्त्र अधिनियम आणि भारतीय दंड विधानच्या विविध कलमांनुसार आरोपपत्र दाखल केले आहे. याप्रकरणी आतापर्यंत मोहम्मद इमरान खान, मोहम्मद युनुस साकी, अब्दुल कादिर पठाण, सिमाब नसीरुद्दीन काझी, झुल्फिकार अली बारोदवाला, शामील नाचन, आकिफ नाचन आणि शहनवाज आलम यांना अटक झालेली आहे.
🛑यंदा समुद्राला पावसाळ्यात १८ दिवस मोठी भरती! – २६, २७ जून जुलैला सर्वात मोठी उधाणं!!
अलिबाग :- प्रतिनिधी
कोकण किनारपट्टीवर यंदा पावसाळ्यात १८ दिवस समुद्राला मोठी उधाणं (भरती) येणार आहेत. त्यामुळे या काळात साडेचार मीटर हून अधिक उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. २६,२७ जूनला पावसाळ्यातील सर्वात मोठी भरती कोकणवासियांना अनुभवता येणार आहे. दरवर्षी पावसाळ्यात समुद्राला मोठी उधाण येत असतात. या उधाणांचा किनारपट्टीवरील भागांना बरेचदा तडाखा बसत असतो. त्यामुळे पावसाळ्यापूर्व समुद्राला येणाऱ्या संभाव्य मोठ्या भरतीचे अंदाजपत्रक आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत जाहीर केले जाते. या दिवशी मच्छीमारांना तसेच किनारपट्टीवरील नागरिकांना सतर्कतेचे आदेश दिले जात असतात.
यावर्षी पावसाळ्यात १८ दिवस मोठी उधाण येतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यात जून मधील पाच, जुलै मधील चार, ऑगस्ट मधील पाच, आणि सप्टेंबर मधील चार दिवसांचा समावेश आहे. या दिवशी समुद्राला साडे चार मीटर पेक्षा अधिक मोठी भरती येणे अपेक्षित आहे. २६ जूनला ४.७५ मीटर, २७ जूनला ४.७३ मीटरची भरती कोकण किनारपट्टीवर अनुभवता येणार आहे. या पार्श्वभूमीवर समुद्र, खाडी तसेच नदी किनऱ्यावरील गावांना स्थानिक पातळवीर आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
🟥रायगड जिल्ह्यात नदी, खाडी आणि समुद्र किनाऱ्यावर एकूण ३८५ गावे आहेत. या गावांना स्थानिक पातळीवर नियोजन करण्याबाबतचे आदेश रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिले आहेत.
🔴उधाणाचा परिणाम काय होतो?
या कालावधीत उधाणांचे पाणी किनारपट्टीवरील भागात शिरण्याची शक्यता असते. समुद्र खवळलेला असतो. त्यामुळे शेतात खारेपाणी शिरून जमीन नापीक होऊ शकते. सखल भागात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. याच कालावधीत अशातच मोठा पाऊस झाल्यास, पाण्याचा निचरा होण्यास अडसर होतो. ज्यामुळे नद्या, नाल्यांना पूर देखील येऊ शकतो. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला समुद्राला येणाऱ्या मोठ्या भरतीची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून जारी केली जाते. नागरिकांना या दिवशी सतर्कता बाळगण्याचे निर्देश दिले जातात.
🟥मोठी भरती असलेले धोक्याचे दिवस
⭕ जून महिन्यात २४ ते २८
⭕जुलै महिन्यात २४ ते २७
⭕ऑगस्ट महिन्यात १० ते १२ आणि २३,२४
⭕सप्टेंबर महिन्यात ८ ते ११
🛑देशातील बँकांचीच १.१० लाख कोटींनी फसवणूक!
सामान्यांच्या पैशांची सुरक्षितता काय?
नवी दिल्ली :- वृत्तसंस्था
केंद्र सरकार बँकांची फसवणूक टाळण्यासाठी विविध पावले उचलल्याचा दावा करते. परंतु मागील चार वर्षांत देशातील बँकांची १ लाख १० हजार ९२३.७५ कोटींनी फसवणूक झाली आहे. त्यापैकी केवळ ५ हजार ४८.२८४३ कोटींचीच (४.५५ टक्के) वसुली झाली. त्यामुळे देशातील विविध बँकांमध्ये सामान्यांनी ठेवलेला पैसा सुरक्षीत आहे काय? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
🛑आर्थिक क्षेत्रात वेगाने होणारे डिजिटायझेशन, सायबर हल्ले, बनावट कागदपत्राद्वारे कर्जाची उचल, या मार्गांनी बँकांच्या फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) केंद्रीय जन सुरक्षा अधिकारी नेगनेईकिम गुईटे यांनी माहिती अधिकारात दिलेल्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष २०२१-२२ ते २०२४-२५ पर्यंत देशातील विविध बँकांची ६ लाख ९३ हजार १२४ प्रकरणात १ लाख १० हजार ९२३.७५ कोटींनी फसवणूक करण्यात आली. त्यापैकी ५ हजार ४८.२८ कोटींचीच वसुली झाली. २०२१-२२ या आर्थिक वर्षात बँकांची ४४ हजार ३४७.०८ कोटींनी फसवणूक झाली. त्यानंतर पुढील दोन वर्षे फसवणुकीची रक्कम निम्म्याहून कमी होती. परंतु २०२४-२५ मध्ये पुन्हा ३४ हजार ६०९.१९ कोटी रुपयांनी बँकांची फसवणूक झाल्याचे सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी पुढे आणले आहे. फसवणुकीच्या तुलनेत वसुली अत्यल्प असल्याने सरकार या वसुलीसाठी ठोस पाऊल कधी उचलणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
🔴बँक फसवणूक म्हणजे काय?
बँक फसवणूक हा आर्थिक गुन्ह्याचा एक प्रकार आहे. ज्यामध्ये वैयक्तिक फायद्यासाठी किंवा इतर गुन्हेगारी कृत्यांसाठी वित्तीय संस्था किंवा तिच्या सेवांचा गैरवापर केला जातो. त्यात खोटे खाते तयार करणे, खोटी ओळख वापरणे किंवा खात्याच्या नोंदींमध्ये फेरफार करणे यासारख्या विविध तंत्रांचा समावेश असू शकतो. यामध्ये चोरीचे क्रेडिट कार्ड , एटीएम कार्ड किंवा वित्तीय संस्थेच्या निधीमध्ये अनधिकृत प्रवेशाचे इतर प्रकार वापरणे देखील समाविष्ट असू शकते. बँक फसवणूक हा एक गंभीर गुन्हा आहे.
🔴बँकांच्या फसवणुकीची स्थिती
🔺स्त्रोत – रिझर्व बँक ऑफ इंडियाकडून माहिती अधिकारात दिलेली आकडेवारी.
……………………………………………………………………………………
आर्थिक वर्ष — प्रकरणे — फसवणूक (कोटीत) — वसूल रक्कम (कोटीत)
……………………………………………………………………………………
२०२१- २२ — ७७,५५१ — ४३,३४७.०८ — ४६३.७७०८
२०२२- २३ — ९६,२८७ — १९,८८४.८३ — १,०९०.१३
२०२३- २४ — ३,४६,०४९ — १३,०८२.६५ — ७५२.८२९५
२-२४- २५ — १,७३,२३७ — ३४,६०९.१९ — २,७४१.५५४
🟥मान्सूनचा प्रवास सुसाट.- महाराष्ट्रात वेळेआधीच धडकणार.- मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण
मुंबई :- प्रतिनिधी
मान्सूनने सध्या श्रीलंकेच्या दक्षिण भागापर्यंत मजल मारली आहे. तसेच बंगालच्या उपसागरात, मालदीव आणि कोमोरीन भागातही त्याने प्रगती केली आहे. दुसरीकडे, महाराष्ट्रात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान निर्माण झालं असून, अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने पुढील पाच दिवसांत काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
मान्सूनच्या वाटचालीसाठी सध्या पोषक वातावरण असल्याची माहिती आहे. त्यामुळे सर्वसाधारण वेळेआधीच मानसून पडणार आहे. गुरूवारी मानसूनने दक्षिण अरबी समुद्रासह, मालदिव -भारत आणि श्रीलंकेच्या नजीक असलेल्या कोमोरिन भाग आणि दक्षिण किनारपट्टीपर्यंत मजल मारली होती. त्यांनतर मानसूनने एक दिवस तिथेच मुक्काम केला. नंतर त्याने हळूहळू आगेकूच केली. शनिवारी मानसूनने पुढे चाल करत दक्षिण अरबी समुद्रात, मालदीव, कोमोरिन भागात आणि बंगालच्या उपसागारातील काही भागात शिरकाव केला. तसेच मानसूनच्या ढगांनी अंदमान आणि निकोबार बेटाला पूर्ण व्यापलं.
🟥हवामान विभागाने पुढील २ दिवसांत मान्सून अरबी समुद्र, मालदीव, कोमोरीन आणि बंगालच्या उपसागरात आणखी भागांमध्ये दाखल होईल, असा अंदाज वर्तवला आहे. या अनुषंगाने पूर्व-मध्य अरबी समुद्रात कर्नाटकच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होण्याची शक्यता आहे. या वाऱ्यांमुळे गुरुवारपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार असल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. राज्यातील विदर्भ, मराठवाडा, खानदेश, मध्य महाराष्ट्र आणि कोकण भागांमध्ये काही ठिकाणी वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यासोबतच, ४० ते ६० किमी/तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले.