ओबीसींचे मसीहा म्हणविणारे तोंडघशी पडले.- भाजपच्या तथाकथित नेत्यांना सळो की पळो करुन सोडणार.- मोहिनी अणावकर यांचा इशारा.
मुंबई. प्रतिनिधी.२१
ओबीसींचे मसीहा आम्हीच आहोत असे एकाबाजूला बेंबीच्या देठापासून ओरडून सांगणारे भारतीय जनता पक्षाचे नेते केंद्र सरकारने काल संसदेत ओबीसींची स्वतंत्र जनगणना करण्याची कोणतीही योजना नाही, असे ठणकावून सांगितले. यामुळे महाराष्ट्रातील तथाकथित ओबीसींचे भाजपाई मसीहा सण्णकन तोंडावर आपटले आहेत. केंद्राच्या हातात असूनही भारतीय जनता पक्षाचे नेते हात वर करीत असतील तर अशा तथाकथित नेत्यांचे हात मुळासकट उखडून टाकायला ओबीसी समाजाला वेळ लागणार नाही. भारतीय जनता पक्षाच्या या ढोंगी पक्षाचा खरा चेहरा आता उघडकीस आला आहे. आता भारतीय जनता पक्षाच्या या नेत्यांना महाराष्ट्रात सळो की पळो करुन सोडल्याशिवाय राहणार नाही, असा सुस्पष्ट इशारा ओबीसी चळवळीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मोहिनी अणावकर यांनी दिला आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत राष्ट्रीय जनता दलाचे मनोज झा यांच्या प्रश्नाला लेखी उत्तर देतांना ओबीसींची स्वतंत्र जनगणना करण्याची केंद्र सरकार ची कोणतीही योजना नाही, असे स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारच्या या उत्तराने महाराष्ट्रातील तमाम ओबीसी समाजाच्या जखमेवर मीठ चोळले असून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या रालोआ सरकारचा ढोंगी आणि खरा चेहरा जनतेसमोर उघडा पडला आहे, असे सांगून मोहिनी अणावकर यांनी पुढे नमूद केले आहे की, दोन दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसींची एक खास परिषद घेण्यात आली. या परिषदेत आम्ही ओबीसींना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे राणा भीमदेवी थाटात सांगितले. या बातमीची शाई सुद्धा वाळत नाही, तोपर्यंत केंद्रातील त्यांच्याच सरकारने ओबीसी समाजाच्या तोंडाला पाने पुसणारे निवेदन संसदेत करुन या नेत्यांना तोंडघशी पाडले आहे. एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी आहेत, मोदींच्या मंत्रिमंडळात सत्तावीस ओबीसी मंत्री आहेत, अशा शब्दांत भाजप वाले छाती बडवितात पण मोदींपासून या सत्तावीस परिवाराच्या समोर पंचपक्वान्नाचे ताट आहे तर संपूर्ण समाज हा उपाशीपोटी, अर्धपोटी फिरतोय, यांची पोटाची खळगी कोण भरणार ? असा ज्वालाग्राही सवाल मोहिनी अणावकर यांनी केला आहे. जोपर्यंत ओबीसी समाजातील उपाशीपोटी, अर्धपोटी जनतेला न्याय मिळवून देण्यात येत नाही तोपर्यंत या तथाकथित मसीहा समजणाऱ्या नेत्यांना सुखाने रस्त्यावर फिरु देणार नाही, असा चंगच ओबीसी समाजाने बांधला आहे, अशी जळजळीत प्रतिक्रिया मोहिनी अणावकर यांनी व्यक्त केली आहे. माजी मंत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी नेत्या पंकजाताई मुंडे या आता काय भूमिका घेत आहेत, याकडेही समाजाचे लक्ष लागले आहे, असेही मोहिनी अणावकर यांनी सांगितले.