आजरा तालुक्यासाठी रुग्णवाहिकांची संख्या वाढवून मिळावी.- बहुजन मुक्ती पार्टी च्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन..
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा तालुक्यासाठी रुग्णवाहिकांची संख्या वाढवून मिळावी तसेच आजऱ्यातील मदरसा गल्लीतील पाणीपुरवठ्याचा प्रश्न सुरळीत व्हावा यासाठी दि. २७ रोजी बहुजन मुक्ती पार्टी यांच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. आजरा तालुक्यामध्ये आजरा ग्रामीण रुग्णालय व उतूर प्राथमिक आरोग्य केंद्र यासाठी केवळ दोन रुग्णवाहिका उपलब्ध आहेत.
मोठा अपघात झाल्यास आजऱ्यातून दवाखान्यात पेशंटला घेऊन जाण्यासाठी नेसरी, चंदगड येथून रुग्णवाहिका मागवाव्या लागतात. यामध्ये जो वेळ वाया जातो त्या वेळेत अनेकदा रुग्ण दगावल्याच्या घटना घडलेल्या आहेत. आजरा तालुक्याची लोकसंख्या वाढत असूनही रुग्णवाहिका दोनच असल्याने लोकांची कुचंबणा होत आहे. याविषयी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने आजरा ग्रामीण रुग्णालय येथे किमान एक अत्याधुनिक सेवा असलेली ALS रुग्णवाहिका व इतर चार प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी BLS रुग्णवाहिका पुरवण्यात याव्यात यासाठी एक दिवशीय लाक्षणिक आंदोलन करण्यात आले. यासोबतच आजरा शहरातील मदरसा कॉलनी येथे पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे, तरी दोन वर्षे उलटूनही यावर नगरपंचायत प्रशासनाला जाग आलेली नाही. लोकांना पाण्या सारख्या मूलभूत प्रश्नासाठी देखील संघर्ष करावा लागत आहे. तरी हा विषय सुद्धा लवकरात लवकर सोडवावा यासाठी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात आले..
बहुजन मुक्ती पार्टीचे युवा आघाडी जिल्हाध्यक्ष किरण कांबळे, यांच्या नेतृत्वात, डॉ. उल्हास त्रिरत्ने, रवी देसाई, डॉ. सुदाम हरेर, अमित सुळेकर, राहुल मोरे, नितीन राऊत, यास्मिन बुड्ढेखान, सलीम महागोंडे, काशिनाथ मोरे, संजय घाटगे, डॉ. इंद्रजीत जाधव, दशरथ सोनुले व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलनाला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.