🟥सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन प्रकल्प गतीने पूर्ण करा.- पर्यटनमंत्री शंभूराज देसाई.
🟥सुनील तटकरेंनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला.- मंत्री भरत गोगावलेंचं मोठं विधान.- राष्ट्रवादी अजितदादा गट व शिंदे गटातील वाद विकोपाला?
मुंबई :- प्रतिनिधी.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाला गती देण्यासाठी राज्यस्तरावर समिती स्थापन करण्यात येणार असून जिल्ह्यात होणारा ताज प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या परवानग्या लवकरात लवकर घ्या व जिल्ह्यातील पर्यटन प्रकल्प गतीने पूर्ण करा असे निर्देश पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
🔴मंत्रालयात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकासाबाबत आयोजित बैठकीत पर्यटनमंत्री श्री. देसाई बोलत होते. यावेळी माजी शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, पर्यटन संचालक डॉ बी. एन. पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज सूर्यवंशी, मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे, दूरदृश्यप्रणालीव्दारे सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी अनिल पाटील, पर्यावरण विभागाचे संचालक अभय पिंपरकर,अधिक्षक अभियंता शैलेंद्र बोरसे, कोकण विभागाचे उपसंचालक हणमंत हेडे यांसह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
🅾️पर्यटन मंत्री श्री.देसाई म्हणाले की, सिंधुदुर्ग हा राज्यातील पहिला पर्यटन जिल्हा आहे. जिल्ह्यातील पर्यटन विकासाच्या अनुषंगाने अनेक पर्यटन प्रकल्प सुरू आहेत. पर्यटनाच्या उपलब्ध असलेल्या विविध योजना व सवलती याच्या अनुषंगाने समन्वय साधण्यासाठी राज्यस्तरावर समिती स्थापन करून सर्व पर्यटन योजनांना गती देण्यात येईल. जिल्ह्यात होणाऱ्या ताज प्रकल्पासाठी पर्यावरणासह आवश्यक त्या परवानग्या घेवून स्थानिक नागरिकांना विश्वासात घेवून प्रकल्प पूर्ण करा. चांदा ते बांदा प्रकल्पातील मंजूर कामांसाठी वर्ग करण्यात आलेल्या निधीची कामे गतीने करा. सिंधुरत्न योजना, जिल्ह्यात सुरू होणारी सबमरीन, दोडामार्ग तालुक्यातील तिलारी पाटबंधारे प्रकल्पातील वॉटर स्पोर्टस या कामांना विभागाने गती द्यावी अशा सूचना मंत्री श्री.देसाई यांनी केल्या.यावेळी आमदार श्री. केसरकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी पर्यटन विभागाने विशेष लक्ष द्यावे.जिल्ह्यातील प्रकल्प गतीने पूर्ण करावेत, पर्यटन प्रकल्पांसाठी पर्यटन विभागाने जास्तीत जास्त निधी द्यावा अशा सूचना त्यांनी केल्या.
🟥सुनील तटकरेंनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला.- मंत्री भरत गोगावलेंचं मोठं विधान.- राष्ट्रवादी अजितदादा गट व शिंदे गटातील वाद विकोपाला?
महाड :- प्रतिनिधी.
महायुतीतील पालकमंत्रिपदाचा वाद सुरू असतानाच आता शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी राष्ट्रवादी अजितदादा गटाचे खासदार सुनील तटकरे यांच्याबाबत खळबळजनक वक्तव्य केले आहे. खासदार सुनील तटकरे यांनी निवडणुकीत आमच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप भरत गोगावले यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे राष्ट्रवादी अजितदादा गट आणि शिंदे गटातील वाद विकोपाला गेल्याची चर्चा सुरू झाली आहे.
🔴महायुती सरकारने पालकमंत्री पदाची यादी जाहीर केल्यापासून महायुतीमधील नेत्यांमध्ये चांगलीच धुसफूस सुरु झाली आहे. याचं कारण म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा मंत्री भरत गोगावले यांना पालकमंत्री पदातून डावलण्यात आलं. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी भरत गोगावले इच्छुक होते. मात्र, रायगडचं पालकमंत्री पद राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नेत्या तथा मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे देण्यात आलं होतं.
🟥मात्र, त्यानंतर भरत गोगावले यांनी आपली जाहीर नाराजी बोलून दाखवली. एवढंच नाही तर त्यांच्या समर्थकांनी महामार्ग रोखत खासदार सुनील तटकरे यांच्याविरोधात घोषणाबाजी केली होती, त्यामुळे चांगलंच राजकारण तापल्याचं पाहायला मिळालं. यानंतर अखेर राज्य सरकारने रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाच्या निवडीच्या निर्णयाला स्थगिती दिली. आता भरत गोगावले यांनी पालकमंत्री पद आपल्यालाच मिळावं, यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा योग्य निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील असं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री कोण होणार? याकडे अनेकाचं लक्ष लागलेलं आहे.
अशातच भरत गोगावले यांनी सुनील तटकरे यांच्यावर हल्लाबोल करत गंभीर आरोप केला आहे. खासदार सुनील तटकरे यांनी निवडणुकीत आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. आम्ही निवडणुकीत प्रामाणिक काम केलं, पण त्यांनी प्रामाणिक काम केलं नाही”, असा आरोप भरत गोगावले यांनी सुनील तटकरे यांच्यावर केला आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते. दरम्यान, रायगडच्या पालकमंत्री पदाच्या मुद्यावरून राष्ट्रवादी आणि शिंदे गटातील वाद चांगलाच विकोपाला गेल्यामुळे आता यावर महायुतीमधील वरिष्ठ काय तोडगा काढणार? हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल. आम्ही व्यवहाराने चालणारे माणसं आहोत. आम्ही चुकीच्या पद्धतीने चालणारे माणसं नाहीत. आम्ही ज्या प्रमाणे निवडणुकीत काम केलं तसंच काम जर त्यांच्याकडून झालं असतं, तर त्याचा विचार केला गेला असता. मात्र, आम्ही प्रामाणिकपणे काम करायचं. पण त्यांनी (सुनील तटकरे) आमच्या पाठीत खंजीर खुपसायचा, मग ही कोणती रित? असं म्हणत भरत गोगावले यांनी सुनील तटकरेंवर हल्लाबोल केला.
