संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या संविधानद्रोही समाजकंटकांविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा – संविधान संवर्धन चळवळीची मागणी.
गडहिंग्लज.- प्रतिनिधी.
संविधान संवर्धन चळवळीचे प्रांताधिकारी गडहिंग्लज यांच्याकडे तात्काळ कारवाई व कार्यवाहीचे लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे.
भारतीय राज्यघटनेचा वरील घटनेमुळे फार मोठ्या प्रमाणात अपमान झालेला आहे. सदरील प्रकार हा देशद्रोहाचा आहे.म्हणून अशा प्रकारच्या देशद्रोहीच्या घटना कोणत्या तरी मोठ्या संघटनेच्या सूत्रधार म्हणून काम करीत आहेत. अशा प्रकारच्या घटना पुन्हा देशात किंवा राज्यात होणार नाहीत या अनुषंगाने, सदरील प्रकरणाचा सखोल तपास हा केंदीय अन्वेषण विभाग यांच्या मार्फत तपास करून, या घटनेमागे कोण मुख्य सुत्रधार आहे त्याला अटक करून त्याच्या विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन, कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी. यापुढे अशा प्रकारच्या घटना होणार नाहीत यासाठी परभणी जिल्हयातील व पूर्ण महाराष्ट्रातील डॉ. बाबासाहेब आबेडकर यांच्या पुतळ्यांना व स्मारकांना 24 तास योग्य ते संरक्षण देण्यात यावे.
परभणी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील (Constitution replica) संविधान प्रतिकृतीची विटंबना करणार्या आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेच्या निषेधार्थ परभणी शहरात बुधवार ११ डिसेंबर २०२४ रोजी बंद पाळण्यात आला होता.या घटनेमागे कोणाचे षडयंत्र आहे, याचा शोध घेण्याच्या मागणीसाठी हा बंद पुकारला होता. दरम्यान घटनास्थळी मंगळवारी सायंकाळच्या सुमारास जिल्हाधिकारी मा. रघुनाथ गावडे यांनी भेट देवून बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घालून परिसराची पाहणी केली. संविधानाची प्रतिकृती नव्याने बसविण्याचे आश्वासन दिले. तसेच आरोपीवर कठोर कारवाई करण्यात येईल. असे सांगण्यात आले. तरीही अशा देशद्रोही घटना करणाऱ्या सर्वांच्या विरोधात कठोर कारवाई करायला पाहिजे आणि संविधानाच्या प्रस्ताविकेच्या प्रतिकृतीची सन्मानाने उभारणी करून त्याची संरक्षणाची जबाबदारी परभणी प्रशासनाने घेतली पाहिजे. परभणी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याशेजारी असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना काही संविधानद्रोही समाजकंटकांनी केलेली आहे. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन झालेले आहे आणि त्यानंतरच संविधानाची अशा प्रकारची विटंबना करणे म्हणजे हा निव्वळ योगायोग आहे की ठरवून केलेले दुष्कृत्य आहे हे असा संशय जनतेच्या मनामध्ये येत आहे. सदर घटना घडून तीन दिवस झालेले असूनही सदर आरोपींना अटक करण्यात आलेले नाही. याउलट आंदोलन करणाऱ्या नागरिकांवरच प्रशासनाच्या वतीने अन्याय करण्यात येत आहे. जे लोकशाहीतील आंदोलन करण्याच्या मूलभूत अधिकाराच्या पूर्णपणे विसंगत आहे. याशिवाय सरकारने सदर प्रकरण संविधानाच्या विरोधात म्हणजेच देशाच्या विरोधात असल्याने सदर आरोपींवर देशद्रोह व राष्ट्र प्रतिष्ठा अवमान अधिनियमच्या अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांच्यावर त्वरित कठोर कारवाई करणे अपेक्षित होते, परंतु अद्याप तसे करण्यात आलेले नाही. तरी आम्ही संविधानाला मानणारे सर्व भारतीय आपणास निवेदन करतो की आपण लवकरात लवकर यामध्ये लक्ष घालून सदर आरोपींना अटक करावे आणि त्यांना कठोर शासन करावे. जेणेकरून यानंतर पुन्हा कोणीही अशा प्रकारची कृती करणार नाहीत.यासाठी आमच्या मागण्या खालीलप्रमाणे आहेत..
1) कायद्याचा अभ्यासक असणारा परभणी येथील आंबेडकरवादी तरूण सोमनाथ व्यंकट सुर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला आहे. सदरील मृत्यूची सखोल चौकशी झाली पाहीजे. जबाबदार असणाऱ्या सर्व संबंधितांवर कठोर शासन झाले पाहीजे.
2)परभणी मधील बौद्ध वस्त्यांंध्ये कौंबिंग ऑपरेशन राबवून सुशिक्षित बौद्ध तरुणांना लक्ष करून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदरील परभणीतील संविधान प्रेमी देशभक्तांवरील दाखल झालेले गुन्हे ताबडतोब मागे घेतलेच पाहिजेत.
3)दिनांक 10/12/24 रोजी सायंकाळी 5.00 च्या दरम्यान, परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालया समोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील (Constitution replica) “भारतीय राज्यघटनेच्या प्रतीकृती” ची विटंबना करुन तोडफोड करणाऱ्या इसमा विरूद्ध आणि अशा घटना करायला लावणाऱ्या व षडयंत्र करणाऱ्या यंत्रणेचा सुत्रधार शोधण्यासाठी “केंद्रीय अन्वेषण विभाग” यांच्या तर्फे तपास करून योग्य ती जलदगतीने कारवाई व कार्यवाही ताबडतोब करणेबाबत…
4) ज्या संघटना, संस्था व व्यक्ती संविधानाला मानत नाहीत, भारतीय राज्यघटनेचा वारंवार अपमान करतात, भारतीय राज्यघटनेचा मूळ ढाचा बदलून धार्मिक ढाचा बनवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशा सर्व संघटना, संस्था व व्यक्ती यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करण्याबाबत….
5)संविधानाच्या प्रस्ताविकेच्या प्रतिकृतीची सन्मानाने उभारणी करून. त्याच्या संरक्षणाची जबाबदारी परभणी प्रशासनाने घेतली पाहिजे…
6) उच्चस्तरीय चौकशी करून परभणी घटनेची सखोल चौकशी करून प्रशासनातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांना बडतर्फ केले पाहिजे.
7) या प्रकरणात विशेष सरकारी वकिलांची नेमणूक ताबडतोब करून तसेच “एस.आय.टी.” ची स्थापना महाराष्ट्र सरकारने ताबडतोब करून सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे…
वरील मागण्या संदर्भात महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री, गृहमंत्री उत्तर द्यायला हवे आहे. पोलीसांनी केलेल्या सरसकट, अंदाजे धरपकडीनंतरच्या कस्टोडीअल हिंसेत विधी महाविद्यालयात शिकणाऱ्या वडार समाजाच्या सोमनाथ सूर्यवंशी या विद्यार्थांचा परभणीतील उद्रेकाशी कसलाही संबंध नसताना खून झालाय. सरसकट अंदाजे, सुडाने बेकसूरांना ताब्यात घेणे, मरेपर्यंत मारणे हे संविधानिक कृत्य आहे काय? कोणी पोलिसांना एवढी ढील दिलेली? का ? भटक्या समूहातील उगवता उजेड विझवण्याचा गुन्हा किती गंभीर आहे, हे तुम्हाला समजतंय का मुख्यमंत्री यांना? दगड फोडून, धुणं भांडीकरून सोमनाथला शिकवणाऱ्या विधवा वडार आईचा टोहो ऐकलात का तुम्ही मुख्यमंत्री व गृहमंत्री यांनी ऐकलेला आहे का?’आम्ही संविधानाचा सर्वोच्च सन्मान करणारं सरकार आहोत.’ हे म्हणताना लाज कशी वाटत नाही? अन्यथा सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीने कारवाईमध्ये दिरंगाई करण्याच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी तीव्र आंदोलने करण्यात येईल.असा इशारा संविधान संवर्धन चळवळीच्या वतीने करण्यात आला आहे. संविधान संवर्धन चळवळीचे मुख्य संघटक संग्राम सावंत, प्रा.सुरेश वडराळे,परशुराम कांबळे, प्रा.प्रकाश कांबळे, महादेव शिंगे,दिंगबर विटेकरी, कृष्णा कांबळे, रमेश शिंगे, वसंत शेटके, भीमराव नंदनवाडे, विनायक कांबळे, राहूल दास, चंद्रशेखर सावरे व पुरोगामी पक्ष संघटना संस्था व्यक्ती यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते.