भाजपच्या फटकार मोर्चात भाजप कार्यकर्त्यांना ‘फटके’ पडल्यानंतर.-
स्थानिक शिवसेना आमदारांची प्रतिक्रिया
मुंबई. प्रतिनिधी.१६ .
भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे तेजिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखाली या फटकार मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. राम मंदिर भूखंड घोटाळ्यावरून शिवसेनेने केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून युवा मोर्चाने आंदोलन पुकारले होते. भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचा मोर्चा शिवसेना भवनावर येणार असल्याची कुणकुण लागताच शिवसेनेनेचे आमदार सदा सरवणकर यांच्यासह शेकडो शिवसैनिक शिवसेना भवना समोर जमले, विशेष म्हणजे त्यात महिलांचा मोठा प्रमाणावर समावेश होता.
यावेळी अनेक भाजप कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आल्याचा जाहीर आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. दरम्यान शिवेसना भवनावर हल्ला करण्याची भारतीय जनता पक्षाची योजना होती असा गंभीर आरोप स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी बोलताना केला आहे.
आमदार सदा सरवणकर म्हणाले की, “भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आंदोलन करणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर शिवसेनेचे कार्यकर्ते शिवेसना भवनात जमले होते. पण जेव्हा भारतीय जनता पक्षाचे काही कार्यकर्ते विटा, दगडं घेऊन शिवसेना भवनवर हल्ला करण्यासाठी येत आहेत अशी माहिती मिळाली तेव्हा शिवसैनिक संतप्त झाले आणि रस्त्यावर उतरले. शिवसैनिकांनी त्यांना थाबवलं असता बाचाबाची झाली,” अशी माहिती स्थानिक शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी शिवसेना भवनावर हल्ला करण्याची भारतीय जनता पक्षाची योजना होती असा आरोपही केला आहे. सदा सरवणकर यांनी यावेळी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना मारहाण झालेली नसून माझ्या निदर्शनास आलेलं नाही सांगत आरोप फेटाळले आहेत.
