शिवराज्याभिषेक दिनी भगवा फडकवण्याला विरोध करणाऱ्या सदावर्ते यांना भाजपाची फूस.- ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा आरोप.
मुंबई. प्रतिनिधी.- ०५.
मराठा आरक्षणाला विरोध करणारे गुणरत्न सदावर्ते यांनी राज्य सरकारच्या आणखी एका निर्णयावर आक्षेप घेतला आहे. भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण करुन राष्ट्रगीत गाणे म्हणजे राष्ट्रद्रोह आहे, या कृतीमुळे देशातील एकता आणि अखंडता धोक्यात येऊ शकते असं मत वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मांडलं आहे. ६ जूनला भगवा ध्वज फडकावून शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून तशा प्रकारचे आदेश सर्व शासकीय कार्यालयांना देण्यात आले आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयावर सदावर्ते यांनी टीका करत मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं आहे.
वकील गुणरत्न सदावर्ते आणि वकील जयश्री पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एक लेखी तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीत असं म्हटलं आहे की, भारतीय संविधान आणि राष्ट्रध्वज संहिता २००२-२००६ नुसार सरकारी कार्यालयावर फक्त राष्ट्रध्वज फडकवण्याची मुभा आहे. त्यामुळे भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण करुन राष्ट्रगीत गाणे म्हणजे राष्ट्रद्रोह आहे. या कृतीमुळे देशातील एकता आणि अखंडता धोक्यात येऊ शकते. उद्या कुणीही येईल निजामचा ध्वज लावा, मोगलांचा झेंडा लावा, पेशव्यांचा झेंडा लावा म्हणू शकतो, किंवा सम्राट अशोकाचा ध्वज फडकावा असेही म्हटले आहे.
दरम्यान, वकील गुणरत्न सदावर्ते यांनी शिवराज्याभिषेक दिनी भगवा फडकवण्याला विरोध केल्यानंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आक्रमक झाले आहेत. कोणत्याही परिस्थितीत शिवस्वराज्य दिन साजरा होणारच असं सांगत सदावर्ते यांना भाजपची फूस असल्याचा आरोप हसन मुश्रीफ यांनी केला आहे.
उद्या (६ जून) होणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार राज्यात आता 6 जूनला भगवा ध्वज फडकावून शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सर्व शासकीय ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद कार्यालयांना 1 जून रोजी तशा प्रकारचा सरकारी आदेश जारी करण्यात आला आहे. त्यामुळे उद्या होणारा शिवस्वराज्य दिन कसा साजरा करायचा यावरुन राज्यातील राजकारण तापण्याची शक्यता आहे.
