नागणवाडी’च्या पाण्याचे समाधानाचे रुप – नागरिकांच्या चेहऱ्यावर उमटण्यासाठी कटीबद्ध – आम. प्रकाश आबिटकर यांचे प्रतिपादन – पांगिरे फाटा येथील पुलाचे लोकार्पण
भुदरगड प्रतिनिधी.
गतिमान राज्य शासनाच्या अधिकाधिक लोकोपयोगी योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचवून ग्रामीण भागाच्या विकासाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आमदारकीच्या माध्यमातून आपली धडपड नेहमीच सुरू असते. तसेच अनेक अडीअडचणीवर मात करत साकार झालेल्या या विभागातील नागणवाडी प्रकल्पाच्या पाण्यामुळे येथील सर्वसामान्य शेतकरी सुखी झालेला पाहण्यासाठी ज्या काही योजना राबविता येतील त्यासाठी आपण प्रयत्नशील आहे. या प्रकल्पातील पाण्याच्या समाधानाचे रूप लोकांच्या चेहऱ्यावर उमटणे गरजेचे आहे. या धरणातील पाण्यामुळे पांगिरे खोऱ्यात आता खऱ्या अर्थाने विकासाची गंगा येणार असून प्रकल्पातील जास्तीत जास्त पाण्याचा वापर करण्यासाठी लोकांनी एकत्र येऊन सहकार तत्वावर उपसा सिंचन योजना राबवून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहचविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन आमदार प्रकाशराव आबिटकर यांनी केले.ते गारगोटी-उत्तुर मार्गावरील पांगिरे फाटा येथे तीन कोटी रुपये खर्चून नव्याने बांधण्यात आलेल्या चिकोत्रा नदीवरील पुलाचा लोकार्पण कार्यक्रम व पांगिरे (ता.भुदरगड) येथे विविध वकासकामांचे शुभारंभप्रसंगी बोलत होते .या कार्यक्रमातच्या अध्यक्षस्थानी सरपंच सर्जेराव पाटील हे होते.
यावेळी आमदार आबिटकर म्हणाले,सन २०२१ मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पांगिरे-हसुर दरम्यान असलेल्या या पुलावर पाणी आल्यामुळे गोवा येथून आलेली बस मध्यरात्रीच्या सुमारास या पाण्यात वाहून गेली होती.यावेळी येथील ग्रामस्थांनी मोठ्या प्रसंगावधानाने सर्व प्रवाशाना सुखरूप बाहेर काढले होते.तसेच पावसाळ्यात पुलावर पाणी येत असल्याने वाहतुकीचा त्रास होत असल्याने हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी आपण सुमारे तीन कोटींचा निधी तात्काळ मंजूर करून आणून पुलाचे काम पावसाळ्यापूर्वी युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहिलो त्यामुळेच पावसाळ्यात या राज्यमार्गावरील वाहतूक आजरोजी सुरळीतपणे सुरू आहे. पांगिरे गाव आता बदलत चालले असून गावच्या विकासासाठी जास्तीत जास्त आवश्यक निधी देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहे.
यावेळी गावातील विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार तसेच कै. सुशिलादेवी आबिटकर हेल्थ फौंडेशनमार्फत आयुष्यमान भारत गोल्डन कार्डचे वाटप करण्यात आले. स्वागतगीत विद्यामंदिर पांगिरेच्या विद्यार्थ्यांनी सादर केले. या कार्यक्रमास उपसरपंच शाहुबाई दंडवते, माजी सरपंच
बाजीराव पाटील,राजाराम भराडे,मारुती भराडे,गणपती भाटले ,सरिता साळोखे, सुरेखा मातले , गिता कांबळे
श्रीधर भोईटे , विद्याधर परीट, सागर मिसाळ, पांडुरंग बोरनाक ,संजय इंगळे , किरण गुरव , प्रकाश धुमाळ , आनंदा शेवाळे , उमेश पाटील आदी उपस्थित होते. प्रास्ताविक तानाजी घोटणे यांनी तर सुत्रसंचालन रघुनाथ भाटले यांनी केले.
चौकट–
नागणवाडी(दिंडेवाडी -बारवे) प्रकल्पामुळे पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याची सोय झाली पण बुडीत क्षेत्रातील दिंडेवाडी -मुरूक्टे दरम्यानचा नदीवरील पुल पाण्याखाली गेल्यामुळे मानवळे, मुरुक्टे, केळेवाडी या गावातील नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना त्रास होत आहे.पण कोणत्याही परिस्थितीत पावसाळ्यानंतर या मार्गावरील पर्यायी रस्ता करून वाहतूकीची अडचण दूर केली जाईल.
