दुग्ध व्यवसाय केल्यास.- उत्पादकाला चांगला फायदा होतो.- श्रीमती अंजनाताई रेडेकर.- सिरसंगीतील मेळाव्यात प्रतिपादन.
आजरा.- प्रतिनिधी.
दुग्ध व्यवसायाकडे शेतीला पुरक व्यवसाय म्हणून न पाहता मुख्य व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय केल्यास, त्यातुन उत्पादकाला चांगला फायदा होतो. त्यामुळे दुध उत्पादकांनी संकरीत जनावरांची पैदास आपल्या गोठ्यामध्ये करावी व स्वत:ची आर्थिक उन्नती साधावी असे प्रतिपादन गोकुळच्या संचालिका अंजनाताई रेडेकर यांनी केले. त्या सिरसंगी ता. आजरा येथिल हनुमान सहकारी दूध संस्थेच्या सभागृहात झालेल्या आनंदराव पाटील म्हैस दुध वाढ व गुणवत्ता सुधार कार्यक्रमाअंतर्गत झालेल्या दुध उत्पादकांच्या बैठकित बोलत होत्या.
प्रारंभी हनुमान दुध संस्थेचे चेअरमन सुभाष देसाई यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविकात कार्यक्रमाचा हेतु स्पष्ट केला. यावेळी बोलताना श्रीमती रेडेकर पुढे म्हणाल्या सुशिक्षित बेरोजगार युवकांनी आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातुन बिनव्याजी कर्ज प्रकरणे करून दुग्ध व्यवसाय सुरू करावा. या व्यवसायामध्ये गोकुळच्या माध्यमातुन दर दहा दिवसांनी दुध बीलाची रक्कम अदा केली जाते. त्यामुळे आपण उत्पादित केलेल्या मालाला योग्य दाम मिळत आहे. याचा लाभ घेवून युवकांनी या व्यवसायाकडे वळावे. मुक्त गोठया सारख्या नविन पध्दतींचा स्विकार करावा. हरियाना, गुजरात येथील मुन्हा, जाफराबादी, मेहसाना यासारख्या संकरित जनावरे आपल्या गोठ्यामध्ये पाळावीत. नविन जनावरे विकत घेण्याबरोबरच वासरू संगोपन ही योजना प्रभावीपणे राबवून स्वतःच्या गोठ्यामध्ये जन्मलेली वासरे लवकरात लवकर कशी दुधात येतील यासाठी प्रयत्न करावा. याकरिता दुध संघाच्या वतीने वासरू संगोपन या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा. असे अवाहन श्रीमती रेडेकर यांनी केले. यावेळी सदर बैठकिला मधुकर यलगार, गणपतराव देसाई, संतोष चौगुले, आनंदराव देसाई, धोंडीराम देसाई, उमेश देसाई, श्रावण, होडगे, नंदकुमार दळवी, दत्तात्रय होडगे, लीला बुडके, शिवाजी कोकीतकर, रेश्मा देसाई, दत्तात्रय देसाई, दुध संघाचे संकलन अधिकारी प्रकाश पाटील, सहा. संकलन अधिकारी महेश कोले, सुपरवायजर विजय केसरकर, बाबुराव धुमाळे, गिरीश रेडेकर, किरण पाटील, विनायक पाटील यांच्यासह गावातील सर्व दुध संस्थांचे पदाधिकारी व दुध उत्पादक उपस्थित होते.
