मुंबईतील जुहू चौपाटीवर 6 जण बुडाले.- दोघांना वाचवण्यात यश,
तर चौघे बेपत्ता
मुंबई:- प्रतिनिधी.
मुंबईतील जुहू चौपाटीवर अंघोळीसाठी गेलेले सहा जण समुद्रामध्ये वाहून गेले. यातील दोघांना वाचवण्यात यश आले असून चार जण अद्याप बेपत्ता आहेत. सोमवारी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास ही घटना घडली असून बेपत्ता लोकांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. महानगर पालिकेने याबाबत माहिती दिली आहे.
अरबी समुद्रात तयार झालेल्या ‘बिपरजॉय’ चक्रीवादळामुळे समुद्राला उधाण आले आहे. समुद्रामध्ये उंच लाटा उसळत असून चौपाटीवर जाणाऱ्या मुंबईकरांना खबरदारी घ्यावी असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले होते. मात्र सोमवारी काही उत्साही लोक जुहू चौपाटीवर अंघोळीसाठी गेले आणि बुडाले. याची माहिती मिळताच बीएमसी, पोलीस, वॉर्ड कर्मचारी आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली. बचाव पथकाने दोन जणांना वाचवले असून चार जण अद्याप बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सुरू आहे.
दरम्यान, हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. यावेळी वेगवान वाऱ्यासह अतिवृष्टी होण्याचा धोका आहे. समुद्रातील वादळी स्थितीची तीव्रता वाढत असून हे वारे मुंबई-कोकणच्या दिशेने पुढे सरकत आहेत. या पार्श्वभूमीवर पालिकेनेही आपली संपूर्ण आपत्कालीन यंत्रणा अलर्ट केली आहे. यामध्ये सर्व चौपाट्यावर पूर बचाव पथके तैनात करण्यात येणार असून पोलीस मोबाईल व्हॅनही सज्ज ठेवण्यात येणार आहेत. तर या कालावधीत पर्यटक-नागरिकांना समुद्रात जाण्यापासून रोखण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली.
असा आहे ‘बिपरजॉय’चा धोका
🔺🔺 ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ मुंबईच्या किनाऱ्यापासून 870 तर गोव्याच्या किनाऱ्यापासून 840 किमी लांबीवर आहे. ते वेगाने महाराष्ट्र, गोवा आणि गुजरातच्या किनारी भागात धडकणार आहे. यामुळे समुद्रात उंच लाटा उसळणार असल्याने मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
