बिगर मोसमी पावसाची राज्यात विविध भागात हजेरी.- कोकण हापूस धोक्यात. – तर उकाडा असह्य
परशुराम घाट रस्त्यावर काही प्रमाणात दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळित.- विजेच्या लपंडावामुळे जनतेचे उकाड्याने अधिकच हाल
मुंबई :- प्रतिनिधी.
गेल्या चार दिवसांपासून राज्यातील काही जिल्ह्यात असलेल्या ढगाळ वातावरणामुळे तापमानात आधीच वाढ झालेली असताना सोमवारी दिवसभर व रात्रीपासून रत्नागिरी शहर आणि परिसरातील कुवारबाव, खेडशी, मिरजोळे, कर्ला, शिरगाव, नाचणे सह अन्य गावांमध्ये बिगर मोसमी पावसाच्या जोरदार सरींनी हजेरी लावली. मंगळवारी सकाळीही पावसाची रिमझिम सुरू होती. जिल्ह्याच्या विविध भागात गेल्या १२ तासांच्या काळात बिगर मोसमी पावसाचे हजेरी लावल्याने आधीच कमी असलेल्या हापूस आंबा पिकाला फटका बसला असून तापमान वाढल्याने लोकांना उकाडा असह्य झाला आहे. त्यातच राज्यातील अन्य जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजेचा लपंडाव सुरू होता त्यामुळे जनतेचे उकाड्याने आणखीच हाल झाले.
पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरील चौपदरिकरणाचे काम सुरू असलेल्या परशुराम घाट रस्त्यावर काही प्रमाणात दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळित झाली. पावसाळा पूर्व तयारीत गुंतलेल्या जनतेला अजूनही कामे आवरालेली नसल्याने बिगर मोसमी पावसाच्या हजेरीने घराच्या बाहेर असलेले साहित्य भिजू नये म्हणून धावपळ करावी लागली. अजूनही अनेक भागात पावसाची रिमझिम सुरू आहे. रत्नागिरी तालुक्यातील काही भागात या पावसाच्या जोरदार सरी झाल्याचे वृत्त आहे. जिल्ह्याच्या अनेक भागात पाणी टंचाई तीव्र असताना बिगर मोसमी पावसाच्या सरी बरसल्या ने पाणी टंचाईचा प्रश्न काही प्रमाणात मिटला असून काही भागांना दिलासा मिळाला आहे. तर काही भागातील पाणी टंचाई तीव्र असून तेथे टँकरचे पाणी पुरविले जात आहे. पाण्यासाठी अनेक ठिकाणच्या गावांमध्ये लोकांना पायपीट करावी लागत आहे. बिगर मोसमी पावसामुळे काजू पिकावर प्रभाव पडणार नसला तरी उर्वरित जे हापूस आंबे अद्यापही झाडांवर आहेत. त्याचे मात्र नुकसान होण्याची शक्यता अधिक आहे. पावसामुळे उर्वरित आंबा लवकर तयार होऊन एकाच वेळी बाजारात येण्याची शक्यता असून १५ ते २० मे पर्यंत हापूस संपुष्टात येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने बिगर मोसमी पावसाचे हजेरी लावल्याचा अंदाज आहे.
