१२ वी ची पुरवणी परीक्षा होणार २१ जुलैपासून.
पुणे. – प्रतिनिधी.
पुणे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी इयत्ता बारावीची पुरवणी परीक्षा २१ जुलै ते १२ ऑगस्टदरम्यान आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातून ५२ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याची माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली. या परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र विद्यार्थ्यांना ९ जुलैपासून उपलब्ध करून देण्यात आले आहे.
इयत्ता बारावीच्या मार्च-एप्रिल २०२२ मध्ये झालेल्या परीक्षेत जे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले, तसेच ज्या विद्यार्थ्यांना श्रेणी सुधार सुविधेचा लाभ घ्यायचा आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षा आयोजित केली जाते. ही परीक्षा राज्य मंडळाच्या वतीने २१ जुलैपासून सुरू होत आहे. तसेच प्रात्यक्षिक परीक्षा, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २० जुलै ते ८ ऑगस्टदरम्यान होईल, असे मंडळाने कळवले आहे. अजूनही या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना नोेंदणी करणे शक्य आहे, कारण १९ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.