एकनाथ शिंदेंवर आनंद दिघेंच्या कुटुंबाकडून पहिली प्रतिक्रिया. –
म्हणाले “दिघे साहेब असते तर गद्दारी सहनच केली नसती.
मुंबई. – प्रतिनिधी.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे बंडखोरी करण्याच्या तयारीत असल्याने महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप आला आहे. एकनाथ शिंदे राजीनामा देण्याची शक्यता असल्याने शिवसेना भवनासमोर शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. यासोबत पक्षाचे नेतेही पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. आनंद दिघेंचे पुतणे केदाऱ शिंदेही शिवसेना भवनाबाहेर उपस्थित असून यावेळी त्यांनी या प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.“एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल खंत आहे. दिघे साहेबांची शिकवण असलेल्या नेत्याकडून असं होणं अपेक्षित नाही. दिघे साहेब असते तर असं घडलंच नसतं. त्यांनी संघटनेशी गद्दारी सहनच केली नसती. एकनाथ शिंदे १०० टक्के चुकले आहेत,” असं केदार दिघे यांनी सांगितलं.
“गद्दारांना क्षमा नाही असं दिघे साहेबांचं ब्रीदवाक्य होतं. शिवसेना कोणत्याही नेत्यामुळे नाही तर सर्वसामान्य शिवसैनिकांमुळे घडली आहे. त्यामुळे येथे एखादा नेता नाही राहिला तरी शिवसैनिकांकडे बाळासाहेबांचे, आनंद दिघेंचे विचार, तत्वं आहेत. त्यामुळे शिवसेना यापुढे अधिक जोमाने जाईल,” असं केदार दिघे यांनी सांगितलं आहे.
एकनाथ शिंदेंनी ट्वीटमध्ये आनंद दिघे यांचा उल्लेख केल्यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, “हे ट्वीट करण्याअगोदर मीडियामध्ये त्यांनी ऑफर पाठवल्याची चर्चा होती. भाजपाकडे जाऊन उपमुख्यमंत्रीद घ्यावं अशी त्यांची मागणी होती. ही बातमी खऱी असेल तर दिघे साहेबांच्या विचाराबाबत कोणी बोलू नये. कारण आपल्या सर्वांना, महाराष्ट्राला आणि भारताला दिघे साहेबांनी संपूर्ण आयुष्य शिवसेनेसाठी त्यागलं होतं हे माहिती आहे. शेवटच्या श्वासापर्यंत ते भगव्याप्रतीच निष्ठावंत राहिले. त्यामुळे याचा आधार घेत कोणी आपली भूमिका मांडू नये”.
“मी आनंद दिघे आणि बाळासाहेबांच्या विचाराने प्रभावित होत २०१० मध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता. २०१६ मध्ये स्थानिक पातळीवरील राजकारणावरुन आणि युवासेनेची घडी नीट बसवल्यानंतर आपल्या मागील तरुणांना योग्य पद मिळावं म्हणून राजीनामा दिला होता. काही पदावर नसलो तरी कायम शिवसैनिक राहीन,” असं यावेळी त्यांनी स्पष्ट केलं.
“ठाण्यात फार गलिच्छ राजकारण सुरु होतं. जिथे मला बोलावण्यात आलं तिथे मी गेलो. आनंद दिघेंचा पुतण्या असल्याने मलाही स्वाभिमान आहे. मी कुठेही लाचार नव्हतो. दरवाजा उघडणं, पाया पडणं माझ्या तत्वात बसत नव्हतं. म्हणून आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराला अनुसरुन मी कार्य करत होतो,” असंही त्यांनी सांगितलं.
“एकनाथ शिंदेंनी शिवसेना वाढवण्यात महत्वाची भूमिका घेतली. पण यावेळी ते एकटे नव्हते तर लाखो शिवसैनिक होते. त्यामुळे कोणत्याही नेत्याने आपण एकटेच शिवसेना वाढवतो असं समजू नये. शिवसैनिकांमुळे ही संघटना वाढली आहे,” असं केदार दिघेंनी सांगितलं. नेतृत्व सांगेल त्याप्रमाणे पुढील वाटचाल असेल असं यावेळी त्यांनी स्पष्ट केलं.
“आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही,” असं एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे