लाट भयानक. लोकांना गांभीर्य कळेना
प्रशासन कडकडीत लॉकडाऊनच्या दिशेने.
मुंबई, १७ एप्रिल:-
मुख्यमंत्र्यांनी राज्यात १ मेपर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत. नागरिकांनी त्याला सहकार्य करावे. मागील लॉकडाऊनमध्ये नागरिकांना बऱ्याच अडचणी सहन कराव्या लागल्या. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढतच आहे. निर्बंध लावूनही काही जागी गर्दी दिसून येत आहे. आता नागरिकांनी निर्बंधांचे पालन केले नाही तर राज्यात पूर्वीप्रमाणे कडक लॉकडाऊन लागू करावा लागेल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दिला. दरम्यान, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मागच्या वर्षीची टाळेबंदी आणि सध्याची संचारबंदी यात फरक असून आणखी कठोर निर्बंधांची गरज व्यक्त केली.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, केंद्राकडून राज्याला १,१२१ व्हेंटिलेटर मिळणार आहेत. पुण्यासाठी १६५ व्हेंटिलेटर मंजूर आहेत. त्यापैकी अवघे १० व्हेंटिलेटरच मिळाले आहेत. उर्वरित मिळण्यासाठी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी संपर्क साधणार आहोत.
अजित पवार म्हणाले,राज्यातील आमदारांना स्थानिक विकास निधीसाठी प्रत्येकी ४ कोटी रुपये दिले जातात. त्यापैकी १ कोटी कोरोनासाठी खर्चण्याची मागणी आमदार करत होते. ती मंजूर केली आहे. राज्यात ३५० आमदार असून या निर्णयाने ३५० कोटी रुपये कोरोना लढ्यात खर्च करण्यात येतील.राज्यात ऑक्सिजन तुटवडा पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रिलायन्स समूहाचे मुकेश अंबानी यांच्याशी चर्चा केली आहे. अंबानींनी ऑक्सिजन पुरवठा करणार असल्याचे सांगितले आहे. रायगड येथील जिंदल समूहाशीही ऑक्सिजनचा पुरवठा आणखी वाढवण्यासाठी बोलणी केली आहे.
राज्यात लोकांचा मुक्त संचार सुरूच आहे. यामुळे काही अत्यावश्यक सेवांवर निर्बंध घालून संचारबंदी आणखी कठोर करण्याचे संकेत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले. ते म्हणाले, भाजी दुकाने, किराणा दुकानावर गर्दी दिसत आहे. त्यांना वेळेचे निर्बंध लावण्याचा विचार होऊ शकतो. अत्यावश्यक सेवेसाठीच इंधन दिले जाण्याचा विचार आहे.