लॉकडाऊनचं लोकांना गांभीर्य नाही. सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
मुंबई,प्रतिनिधी. १५ .
महाराष्ट्रात 14 एप्रिल रात्री 8 वाजल्यापासून पुढचे 15 दिवस म्हणजेच 1 मेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात काय सुरु राहील आणि काय बंद राहील, असे अनेक प्रश्न सामान्यांना पडले आहेत. मात्र प्रतिदिन हजारो लोकं कोरोनाने मृत्युमुखी आणि लाखो लोकं कोरोनाबाधित होतं असताना देखील जनतेला गांभीर्य नसल्याचं पहिल्या दिवशी स्पष्ट झालं आहे.
अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका असं आवाहन मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलंय. मात्र, राज्यातील विविध भागात रस्त्यांवर, किराणा दुकान, भाजीपाला खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यातील लॉकडाऊन आता अधिक कडक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचं मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलंय.मुंबई, नवी मुंबई, पुणे, औरंगाबाद अशा राज्यातील विविध भागात रस्त्यांवर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. यामध्ये किराणा दुकान, भाजीपाला मार्केट, मुंबईतील लोकलमध्येही लोकांची वर्दळ पाहायला मिळाली. त्यामुळे सरकारकडून लॉकडाऊन अधिक कडक करण्यात येणार आहे. मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तसे स्पष्ट संकेत दिले आहेत.
राज्यात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे दोन दिवसांत कडक कारवाई केली जाणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल-डिझेल मिळणार नाही.तहसीलदारांच्या पत्रानुसार फक्त अत्यावश्यक सेवेसाठी इंधन दिले जाणार असून, त्याबाबत सरकार विचाराधीन असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली आहे.लोकल सेवेचा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी वगळून इतरांनी वापर केल्यास त्यांच्यावरही कडक कारवाई केली जाणार आहे. लोकल सेवा वापराबाबत कडक निर्बंध करावे यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणी झाल्याचंही वडेट्टीवारांनी सांगितलं.