मुख्यमंत्र्यांकडून शरद पवारांना भेटीसाठी वेळ देण्यास टाळाटाळ?
भाजपचे आमदार व नेते नितेश राणेंच्या दाव्याने खळबळ
मुंबई :- प्रतिनिधी.
उद्योजक मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली कार आढळल्याप्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने ताब्यात घेतलं आहे. अशातच, मनसुख हिरेन मृत्यू, पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक यावरून भाजप नेत्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारला चांगलंच घेरल्याचं चित्र पाहायला मिळतंय.
अशातच आज भाजप आमदार नितेश राणे यांनी, ‘महाविकास आघाडीतील महत्वाचे नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागील बुधवारपासून भेट घेण्याच्या प्रयत्नात होते मात्र मुख्यमंत्र्यानी त्यांना आज वेळ दिली’ असा खळबळजनक दावा केला आहे.यावेळी नितेश राणे यांनी, ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अभिनेता आमिर खान याच्यासोबत शुक्रवारचे जेवण करण्यासाठी वेळ आहे, मात्र त्यांच्याकडे महाविकास आघाडीतील प्रमुख नेते असलेल्या शरद पवार साहेब यांना भेटण्यासाठी वेळ नाही’ असा टोला देखील लगावला.यावेळी राणे यांनी, युवासेनेचे सचिव वरून सरदेसाई यांच्यावरही गंभीर आरोप लगावले. पोलीस अधिकारी सचिन वाझे हा आयपीएल स्पर्धेवर सट्टा लावणाऱ्यांना संपर्क साधून मला ठराविक रक्कम द्या अथवा तुमच्यावर कारवाई करू असे धमकावत असल्याची माहिती आमच्याकडे आहे.
वाझे व सरदेसाई यांच्यामध्ये संभाषण झाल्याचा आरोप करत राणे यांनी पुढे, ‘महाराष्ट्र सरकारने वाय दर्जाची सुरक्षा दिलेल्या वरून सरदेसाई यांचा सचिन वाझे यांच्यासोबत संवाद आहे. यामध्ये ते वाझेंना, तुम्ही याची मागणी का करताय? यामध्ये तुमचा वाटा आहे काय असं विचारत’ असा दावा केला.
