कोणत्याही व्यक्तीचा कमाईवर फक्त त्याची पत्नी, मुलं यांचा अधिकार असतो असं नाही तर त्याच्या वृद्ध आई वडिलांचासुद्धा वाटा.
नवीदिल्ली. – वृतसंस्था.
दिल्ली – पोटगी प्रकरणी न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. न्यायालयाने म्हटलं की, कोणत्याही व्यक्तीचा कमाईवर फक्त त्याची पत्नी, मुलं यांचा अधिकार असतो असं नाही तर त्याच्या वृद्ध आई वडिलांचासुद्धा वाटा असतो. त्याच्या उत्पन्नाचा त्यांनाही लाभ मिळायला हवा. पत्नी आणि मुलांच्या बरोबरीने कोणत्याही व्यक्तीच्या कमाईवर त्याच्या आई वडिलांचा अधिकार असतो असं न्यायालयाने म्हटलं.
तीस हजारी जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश गिरीष कथपालिया यांनी न्यायालयात या प्रकरणी सुनावणी केली. यामध्ये महिलेच्या याचिकेनंतर पतीला उत्पन्नासंबंधी प्रतिज्ञापत्र सादर कऱण्यास सांगितलं होतं. महिलेचं म्हणणं होतं की, पतीचं मासिक उत्पन्न पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त आहे.
तरीही तिच्या मुलांना आणि तिला फक्त दहा हजार रुपये पोटगी दिली जात आहे. पतीने प्रतिज्ञापत्र जाहीर करताना म्हटलं होतं की, माझे मासिक उत्पन्न 37 हजार रुपये आहे. यातील रक्कमेतून पत्नी आणि दोन वर्षांच्या मुलाचा सांभाळ कऱण याशिवाय वृद्ध आई वडिलांची काळजी घ्यावी लागते.
न्यायालयानं पतीच्या प्रतिज्ञापत्रानंतर सुरक्षा अधिकाऱ्यांना रिपोर्ट सादर कऱण्यास सांगितलं होतं. अधिकाऱ्यांनी रिपोर्टमध्ये सांगितलं होतं की, पतीने योग्य कागदपत्रे सादर केली आहेत. त्याच्या आयकर खात्यानुसार उत्पन्न 37 हजार रुपये आहे. तसंच रिपोर्टमध्ये त्याच्यावर आई वडिलांची जबाबदारी असून त्यांच्या आजारपणाचा खर्चही पतीकडून केला जातो. न्यायालयाने या रिपोर्टला गांभीर्याने घेतलं.
दरम्यान, पत्नीने न्यायालयात म्हटलं की, पतीवर असलेल्या इतर जबाबदाऱ्यांपेक्षा तिची आणि मुलाची जबाबदारी महत्त्वाची आहे. त्यामुळे जास्त पोटगी मिळावी अशी मागणी तिने केली होती.
हे वाचा – ‘मला कोरोना झालाय’, दिल्ली To पुणे विमान उड्डाणावेळी प्रवाशाने सांगितल्याने खळबळ
न्यायालयाने या प्रकऱणी सुनावणी करताना पतीच्या उत्पन्नाची विभागनी सहा भागात केली. यातील दोन भाग पतीला, तर पत्नी, मुलगा आणि आई-वडिल यांना प्रत्येक एक भाग देण्यात यावा. पत्नी आणि मुलाच्या वाट्याला यामध्ये 12 हजार 500 रुपये येतात. आता दर महिन्याच्या दहा तारखेला पत्नी आणि मुलाला पोटगीची रक्कम द्यावी असं न्यायालयाने पतीला सांगितलं.
